झेकच्या २० राजनैतिक अधिकार्‍यांचे रशियाकडून हकालपट्टीचे आदेश

मॉस्को – झेक प्रजासत्ताने रशियाच्या १८ राजनैतिक अधिकार्‍यांना आपला देश सोडून जाण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. पण १९ एप्रिलच्या मध्यरात्रीच्या आधीच झेकच्या २० राजनैतिक अधिकार्‍यांनी देशाबाहेर चालते व्हावे, असे आदेश रशियाने दिले आहेत. याशिवाय रशियाने झेकच्या राजदूतांना समन्स बजावून आपला संताप व्यक्त केला. त्याचबरोबर रशियन अधिकार्‍यांच्या हकालपट्टीसाठी अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. २०१४ साली झेक प्रजासत्ताकाच्या लष्करी कोठारात भीषण स्फोट झाले होते. त्यावेळी ही एक दुर्घटना असल्याची घोषणा झेकच्या लष्कराने केली होती. पण याप्रकरणी रशिया असून रशियन गुप्तचर यंत्रणेच्या एजंट्सनी हे स्फोट घडविल्याचा आरोप झेक यंत्रणा करीत आहेत.

आपल्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी झेक यंत्रणांनी सदर स्फोटात सहभागी असलेल्या रशियन गुप्तचर यंत्रणेच्या एजंट्सची माहितीही उघड केली. यानंतर झेक प्रजासत्ताकने रशियाच्या १८ राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टीची घोषणा केली. तसेच पुढील ४८ तासात सदर अधिकार्‍यांनी झेक सोडून मायदेशी परतावे, असे आदेश दिले. झेकच्या सरकारच्या या कारवाईला काही तास उलटत नाही तोच रविवारी रात्रीच रशियाने राजधानी मॉस्कोतील झेकच्या राजदूतांना समन्स बजावले. तसेच या कारवाईची कठोर शब्दात निर्भत्सना केली. याशिवाय झेकच्या दूतावासातील २० अधिकार्‍यांनी सोमवारी मध्यरात्रीआधीच रशिया सोडून जावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

सोमवारनंतर झेकचे दूतावास बंद करण्यात येणार आहे. यामुळे रशियातील झेकच्या राजनैतिक सेवेवर परिणाम होणार असल्याचा दावा केला जातो. नाटो व युरोपिय महासंघाचा सदस्यदेश असलेल्या झेकने रशियाविरोधात उचललेल्या पावलासाठी अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी केला आहे. तसेच या कारवाईचे धागेदोरे कुठेतरी बेलारूसमधील सरकारविरोधी कटाशी जोडल्याचा दावा झाखारोव्हा यांनी केला. रविवारी रशियाने बेलारूसमधील सरकार उलथण्याचा मोठा कट उधळून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. या कटामागे अमेरिका असल्याचा आरोप रशिया व बेलारूसने केला आहे. दरम्यान, अमेरिका आणि रशियातील राजनैतिक स्तरावर जोरदार द्वंद्व पेटले आहे. अमेरिकेकडून रशियन अधिकार्‍यांवर निर्बंध लादणे, रशियाकडून त्यावर जशास तशी कारवाई यामध्ये अमेरिका-रशिया आमनेसामने होते. पण आत्ता झेक प्रजासत्ताक आणि बेलारूसमधील घडामोडी पाहता, अमेरिका व रशियामध्ये अप्रत्यक्ष द्वंद्व सुरू असल्याचे दिसत आहे.

leave a reply