रशिया हा ब्रिटनच्या सुरक्षेला असलेला पहिल्या क्रमांकाचा धोका

- ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस

लंडन/मॉस्को – रशियन युद्धनौका व पाणबुड्यांचा ब्रिटनच्या सागरी हद्दीतील वावर वाढत असून, रशिया हा ब्रिटनच्या सुरक्षेसाठी पहिल्या क्रमांकचा धोका आहे असे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी बजावले. यावेळी संरक्षणमंत्री वॉलेस यांनी 2018 साली रशियन यंत्रणांनी सॅलिस्बरीमध्ये घडविलेल्या रासायनिक हल्ल्याचाही उल्लेख केला. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून रशियाला इशारा दिला होता. त्यानंतर आता संरक्षणमंत्र्यांनी केलेले वक्तव्य रशिया व ब्रिटनमधील तणाव चिघळत असल्याचे संकेत देत आहेत.

रशिया हा ब्रिटनच्या सुरक्षेला असलेला पहिल्या क्रमांकाचा धोका - ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेसगेली काही वर्षे ब्रिटन व रशियामध्ये सातत्याने खटके उडत आहेत. 2014 साली रशियाने क्रिमिआवर केलेल्या हल्ल्यानंतर ब्रिटनने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ब्रिटनने रशियाबरोबरील लष्करी सहकार्य थांबवून निर्बंधांची घोषणाही केली होती. ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वमतात रशियाने हस्तक्षेपाचा प्रयत्न केल्याचे दावेही करण्यात आले होते.

2018 साली ब्रिटनमधील माजी रशियन अधिकारी व त्याच्या मुलीवरील रासायनिक हल्ल्यानंतर दोन देशांमधील तणाव टोकाला पोहोचला होता. त्यानंतर सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून दोन देशांमधील दुरावा अधिकच वाढला होता.

या पार्श्‍वभूमीवर, ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियाचा उल्लेख पहिल्या क्रमांकाचा धोका म्हणून करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांच्या या इशार्‍यामागे रशियन नौदलाकडून ब्रिटनच्या हद्दीत वाढलेल्या हालचालींचा मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनच्या पेट्रोल शिपने रशियन पाणबुडीच्या संशयास्पद हालचाली टिपल्या होत्या.

रशिया हा ब्रिटनच्या सुरक्षेला असलेला पहिल्या क्रमांकाचा धोका - ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेसत्यापूर्वी 2020 सालच्या अखेरीस 15 दिवसांच्या अवधीत रशियाच्या नऊ युद्धनौका व पाणबुड्या ब्रिटीश हद्दीनजिक आढळल्या होत्या. शीतयुद्धाच्या काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रशियन युद्धनौकांच्या वावराची ही पहिलीच घटना ठरली होती.

ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियन नौदलाच्या या वाढत्या हालचालींचा संदर्भ देऊन, रशियाबरोबरील तणाव कमी करण्यासाठी ब्रिटनने अनेक प्रयत्न केल्याचा दावा केला. मात्र यापुढे रशियाने त्यांचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय तणाव निवळण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट शब्दात बजावले. रशियाच्या वाढत्या धोक्याबाबत बजावताना संरक्षणमंत्री वॉलेस यांनी ब्रिटनही आपल्या नौदलाची क्षमता वाढवित असल्याची जाणीव करून दिली.

ब्रिटनची नवी विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ व या युद्धनौकेची नवी तैनाती, ब्रिटन ‘ग्लोबल मिलिटरी फोर्स’ असल्याचे दाखवून देणारी आहे, असे वॉलेस यांनी सांगितले.

दरम्यान, रशिया नवे हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करीत असल्याचा दावा रशियातील ‘इझ्वेस्तिया’ दैनिकाने केला आहे. या नव्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रात सर्व अत्याधुनिक ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ना भेदण्याची क्षमता असल्याचे दैनिकाने म्हटले आहे. या क्षेपणास्त्रासाठी स्वतंत्र इंजिन विकसित करण्यात आले असून पुढील वर्षापासून चाचण्या सुरू होतील, असेही सांगण्यात आले आहे. सध्या या क्षेपणास्त्राला ‘ऑस्ट्रोटा’ असे नाव देण्यात आले असून ते ‘टीयु-22एम3’ व ‘एसयु-34’ या बॉम्बर्स विमानांवर तैनात करण्यात येईल, असे वृत्त रशियन दैनिकाने दिले आहे.

leave a reply