कोलोनिअल सायबरहल्ल्यामागे रशियाचा हात नाही – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकेतील सर्वात मोठी इंधनवाहिनी असणार्‍या ‘कोलोनिअल पाईपलाईन’वर झालेल्या सायबर हल्ल्याच्या मागे ‘डार्कसाईड’ ही संघटना असल्याचे अमेरिकन तपास यंत्रणेने जाहीर केले. सायबर सुरक्षा कंपन्या तसेच तज्ज्ञांच्या मते डार्कसाईड ही रशियाशी निगडीत असलेली सायबर गुन्हेगारी करणारी संघटना आहे. असे असले तरी ‘कोलोनिअल पाईपलाईन’वरील सायबरहल्ल्यात रशियाचा हात नसल्याचा दावा करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सर्वांना चकीत केले आहे.

कोलोनिअल,सायबरहल्ला, डार्कसाईड, बायडेन, इशारा, अमेरिका, रशिया, न्यूजर्सीसोमवारी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी कोलोनिअल पाईपलाईनवर झालेल्या सायबरहल्ल्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘कोलोनिअलवर झालेला सायबरहल्ला रॅन्समवेअर प्रकारातील हल्ला असल्याचे ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन-एफबीआय’ने सांगितले आहे. हा हल्ला एक गुन्हेगारी कृत्य आहे. एफबीआय व न्यायविभागाकडून पुढील कारवाई सुरू असून गुन्हेगारांना योग्य शिक्षा होईल. हल्ल्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचा सहभाग असून त्याविरोधात अमेरिकेने जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत’ असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सांगितले.

कोलोनिअल,सायबरहल्ला, डार्कसाईड, बायडेन, इशारा, अमेरिका, रशिया, न्यूजर्सीयावेळी बायडेन यांना हल्ल्यामागे रशियाचा हात आहे का, असा सवाल विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना, अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या तरी हल्ल्यात रशियाचा हात असल्याचे समोर आलेले नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले. मात्र त्याचवेळी रॅन्समवेअरची बनावट रशियन असल्याचे उघड झाले असल्याने रशियाला काही प्रमाणात तरी जबाबदारी घ्यावी लागेल, असेही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर होणार्‍या बैठकीत आपण हा मुद्दा उपस्थित करु, असा दावाही बायडेन यांनी यावेळी केला.

कोलोनिअल,सायबरहल्ला, डार्कसाईड, बायडेन, इशारा, अमेरिका, रशिया, न्यूजर्सीएफबीआयकडून ‘डार्कसाईड’चा हात असल्याचे निवेदन जारी झाल्यानंतर बायडेन यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे आश्‍चर्यचकित करणारे ठरले आहे. सायबरसुरक्षा कंपन्या व तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, ‘डार्कसाईड’ हा गट रशियाशी निगडीत आहे. या गटाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये रशियन कंपन्यांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. हा गट रशियाच्या जवळपास असलेल्या देशातून चालविण्यात येत असून त्याला रशियाकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा संशयही आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिकेतील सरकारी यंत्रणा तसेच खाजगी कंपन्यांवर मोठे सायबरहल्ले झाल्याचे उघड झाले होते. या हल्ल्यांमागे रशिया तसेच चीनचा हात असल्याची माहिती अमेरिकी प्रशासनाकडून देण्यात आली होती. प्रत्युत्तरादाखल रशियन यंत्रणांवर हल्ल्याचे निर्देशही देण्यात आले होते. तर बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रशियाविरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्याचे संकेत देऊन तसे निर्णयही घेतले होते. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता बायडेन यांनी, रशियाचा हात नसल्याचे वक्तव्य करण्याची घटना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे.

पूर्व अमेरिकेत न्यूजर्सीपासून ते टेक्सासपर्यंत पसरलेल्या ‘कोलोनिअल पाईपलाईन’वर शुक्रवारी सायबरहल्ला झाल्याचे समोर आले होते. हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने आपले पाईपलाईन नेटवर्क पूर्णपणे बंद केले होते. जवळपास नऊ हजार किलोमीटर लांबीच्या या इंधनवाहिनीतून अमेरिकेत दररोज सुमारे २३ लाख बॅरल इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. कोलोनिअलवरील सायबरहल्ला अमेरिकेच्या इंधनक्षेत्रावर झालेला सर्वात मोठा सायबरहल्ला ठरतो.

leave a reply