युक्रेनच्या क्रिमिआवरील रशियाचा ताबा तुर्कीला मान्य नाही

- तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन

रशियाचा ताबाअंकारा – रशिया आणि तुर्कीतील संबंध पुन्हा एकदा ताणले गेल्याचे दिसत आहे. युक्रेनच्या क्रिमिआवर रशियाने मिळवलेला ताबा तुर्कीला मान्य नसल्याचे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी जाहीर केले. युक्रेनची अखंडता आणि सार्वभौमत्वाला तुर्कीचा पाठिंबा असेल. तसेच नाटोच्या सदस्यत्वासाठी युक्रेनच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना तुर्कीचे पूर्ण समर्थन असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केली. त्यामुळे रशियाबरोबरील सहकार्य प्रस्थापित करून अमेरिका-नाटोचा रोष ओढावून घेणार्‍या तुर्कीचा पुन्हा नाटोच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी तुर्कीचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची भेट घेतली. युक्रेन आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या लष्करी तणावाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची ही भेट महत्त्वाची ठरत होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी २०१४ साली रशियाने क्रिमिआला युक्रेनपासून वेगळे करून आपल्यात सामील करून घेतले होते. रशियाच्या या कारवाईवर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी टीका केली.

रशियाचा ताबा‘युक्रेनपासून क्रिमिआच्या फाळणीला तुर्कीचा तत्वत: असलेला विरोध आजही कायम आहे. क्रिमिआला युुक्रेनमध्ये सामील करण्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांना तुर्कीचे समर्थन आहे. युक्रेन तसेच क्रिमिआच्या जनतेसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना यश मिळेल’, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी व्यक्त केली. युक्रेनने क्रिमिआवर पुन्हा नियंत्रण मिळवावे, ही आपली भूमिका कुठल्याही त्रयस्थ देशाविरोधात नसल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी रशियाचा उल्लेख करण्याचे टाळले.

युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर चिंताजनक घडामोडी घडत असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी रशियाचा जाहीरपणे उल्लेख करण्याचे टाळले. तसेच अमेरिका, कॅनडा व युरोपिय देशांच्या नाटो या लष्करी संघटनेत आपल्या देशाचाही समावेश व्हावा, यासाठी युक्रेनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी समर्थन दिले. याशिवाय युक्रेन आणि तुर्कीमध्ये लष्करी सहकार्याला मजबूत करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची घोषणा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली. त्यामुळे एर्दोगन यांनी नाटोच्या दिशेने व रशियाच्या विरोधात प्रवास सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply