रशियाने अमेरिकेला मध्य आशियातील तळांचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला

- रशियन वर्तमानपत्राचा दावा

रशियाने अमेरिकेलामॉस्को – अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांसाठी अमेरिकेची बेजबाबदार सैन्यमाघार कारणीभूत असल्याचा आरोप रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यामुळे अफगाणिस्तानच्या मुद्यावर अमेरिका व रशियामधील मतभेद कायम असल्याचे पुन्हा उघड झाले होते. पण अफगाणिस्तानच्याच प्रश्‍नावर रशियाने अमेरिकेला सहकार्याची ऑफर दिल्याची बातमी आली आहे. तालिबानवर नजर ठेवण्यासाठी रशियाने अमेरिकेला मध्य आशियातील लष्करी तळांचा प्रस्ताव दिल्याचा दावा एका रशियन वर्तमानपत्राने केला.

गेल्या आठवड्यात ताजिकिस्तानच्या दुशान्बे आणि उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे अफगाणिस्तानच्या आघाडीवर महत्वपूर्ण बैठका पार पडल्या. या दोन्ही बैठकांमध्ये रशियाने अमेरिकेच्या विरोधात स्वीकारलेल्या भूमिकेबाबत ‘कॉमरसँट’ या रशियातील आघाडीच्या वर्तमानपत्राने बातमी प्रसिद्ध केली. या बैठकीत रशियाने अफगाणिस्तानच्या मुद्यावर अमेरिकेवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच अफगाणिस्तानातील अस्थैर्याचा परिणाम मध्य आशियाई देशांवर होईल, अशी टीका रशियाने केली होती, याकडे या वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

पण अमेरिकेवर टीका करणार्‍या रशियाने महिन्याभरापूर्वी अमेरिकेला अफगाणिस्तानबाबत स्वतंत्र प्रस्ताव दिला होता, असा दावा या वर्तमानपत्राने केला. 16 जून रोजी जीनिव्हा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला मध्य आशियाईतील ताजिकिस्तान आणि किरगिस्तान येथील रशियाच्या लष्करी तळांचा वापर करावा, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुचविले होते, असे कॉमरसँटने आपल्या बातमीत म्हटले आहे.

रशिया व अमेरिका यांनी मिळून अफगाणिस्तानात संयुक्त मोहीम राबवावी, असा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना दिला होता, असा दावा या वर्तमानपत्राने केला. रशियन सरकारची या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अफगाणिस्तानातील तालिबानच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेने या लष्करी तळांवर ड्रोन्स तैनात करावे व ही माहिती आपल्यालाही पुरवावी, असे रशियाने सुचविल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

तालिबानवर फक्त नजर ठेवायची असती तर बायडेन प्रशासनाने रशियन राष्ट्राध्यक्षांचा प्रस्ताव तेव्हाच स्वीकारला असता. पण अमेरिकेचे अफगाणिस्तानविषयक धोरण एवढ्यापुरते मर्यादित नाही, असे कॉमरसँटने म्हटले आहे. याच कारणामुळे अजूनही रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या प्रस्तावाला अमेरिकेने उत्तर दिलेले नाही, असा दावा या वर्तमानपत्राने केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी ताजिकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सिरोजिद्दीन मुहिरोद्दीनविच अस्लोव आणि उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री अब्दुलअझिझ कॅमिलोव्ह यांची भेट घेतली होती. तसेच गेल्या आठवड्यात रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी मध्य आशियातील पाचही मित्रदेशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली होती. या भेटींमध्ये अफगाणिस्तानचे स्थैर्य व शांतता याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पण रशियाने अमेरिकेला देऊ केलेल्या तळाबाबत काही निर्णय झाला नाही, अशी माहिती सदर दैनिकाने दिली.

दरम्यान, अफगाणिस्तानाला सीमा भिडलेल्या ताजिकिस्तानातील तळावर रशियाचे सहा हजार जवान तैनात आहेत. तर अफगाणिस्तानच्या सीमेपासून 500 मैल अंतरावर असलेल्या किरगिस्तानातील तळावरही रशियन जवानांची तैनाती आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींचा मध्य आशियाई देश व त्यानंतर रशियाच्या सुरक्षेवरही परिणाम होईल, याची पूर्ण कल्पना रशियाला आहे. म्हणूनच रशिया अफगाणिस्तानातील घडामोडींकडे अत्यंत सावधपणे पाहत आहे.

परस्परांकडे वैरी म्हणून पाहणारे अमेरिका व रशिया अफगाणिस्तानच्या मुद्यावर सहकार्य करीत असतील, तर ती पाकिस्तानसाठी चिंताजनक बाब ठरते, असे सांगून एका पाकिस्तानी पत्रकाराने त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

leave a reply