मध्य आशियात अमेरिकेला लष्करी तळ पुरविण्यास रशियाचा नकार

मॉस्को – अफगाणिस्तानात दहशतवादी संघटना पुन्हा प्रबळ झाल्या तर ‘ओव्हर दी हॉरिझोन’ अर्थात हवाई हल्ल्यांचा पर्याय वापरण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. यासाठी मध्य आशियातील लष्करी तळाचा वापर करण्याचा विचार असून याबाबत रशियाबरोबर चर्चा सुरू असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली होती. पण अमेरिकेला मध्य आशियातील लष्करी तळ पुरविण्यास विरोध असल्याचे रशियाने म्हटले आहे. मध्य आशियातील कुठल्याही देशात अमेरिकेची लष्करी उपस्थिती रशिया अजिबात सहन करणार नसल्याचे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी ठणकावले.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून बेजबाबदाररित्या माघार घेतल्याचा आरोप अमेरिकेत होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आठवड्यापूर्वी अमेरिकेचे संरक्षणमंत्री, संरक्षणदलप्रमुख व सेंटकॉमच्या प्रमुखांची अमेरिकन सिनेटच्या समितीसमोर सुनावणी झाली. यामध्ये अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढविले जातील, असे म्हटले होते. आखातातील लष्करी तळावरुन हे शक्य नसल्याचे मान्य करून संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमधील लष्करी तळाचा वापर करण्यात येईल, असा दावा केला होता.

साधारण दोन महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीतही मध्य आशियातील लष्करी तळाचा वापर करण्यावर चर्चा झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. उझबेकिस्तान किंवा ताजिकिस्तानमध्ये लष्करी तळ मिळविण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू होते. वीस वर्षांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ होते.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया न्यूलँड या सोमवारपासून रशियाच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दांवर चर्चा होणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अफगाणिस्तानच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री रिब्कोव्ह यांनी सांगितले.

‘अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीसाठी अमेरिका व त्यांचे मित्रदेश जबाबदार असून यापुढे अफगाणिस्तानात सुस्थिती आणण्याची जबाबदारी देखील अमेरिका व मित्रदेशांवरच आहे’, अशी खरमरीत टीका रिब्कोव्ह यांनी केली. त्याचबरोबर सोव्हिएत रशियाच्या माजी सदस्य देशांमध्ये अमेरिकेला लष्करी तळ पुरविण्यात रशियाचा कडवा विरोध असल्याचे रिब्कोव्ह यांनी स्पष्ट केले. रशियाच्या या भूमिकेवर अमेरिकेने प्रतिक्रिया दिलेली नाही.

अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर रशियाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून ताजिकिस्तानच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगून रशियाने ताजिकिस्तानच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई करण्याची घोषणा केली. रशिया लवकरच ताजिकिस्तानच्या सीमेवर युद्धसराव आयोजित करणार आहे. त्याचवेळी रशियाने तालिबानला चर्चेसाठी आमंत्रित करून वाटाघाटींसाठी आपले दरवाजे मोकळे ठेवले आहेत.

leave a reply