रशिया सायबरहल्ल्यांची जबाबदारी टाळू शकत नाही – ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांचा इशारा

लंडन/मॉस्को – ‘सायबरहल्ला करणारे हॅकर्स घातपात घडवून अडथळे आणण्यावर भर देताना दिसतात. हे घटक म्हणजे २१ व्या शतकातील मोठ्या उपद्रवी टोळ्या असल्याचे म्हणता येईल. पण केवळ उपद्रव देणे हा त्यांचा हेतू नाही. एखाद्या देशाचे समर्थन असणारे हे घटक व गुन्हेगारी टोळ्या लोकशाही कमकुवत करण्याचेही प्रयत्न करीत आहेत. रशियासारखा देश जेव्हा अशा हॅकर्सना व गुन्हेगारी टोळ्यांना आश्रय देतो, त्यावेळी आम्ही काही केलेले नाही असे सांगून हाताची घडी घालून त्यांना स्वस्थ बसता येणार नाही. या हॅकर्स तसेच टोळ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारीही रशियाचीच आहे, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी’, या शब्दात ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर रशियाला खरमरीत इशारा दिला.

डॉमिनिक राब, इशारा, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री, सायबरहल्ला, ब्रिटन, रशिया, इंडो-पॅसिफिकबुधवारी ब्रिटनमध्ये ‘सायबरयुके कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परराष्ट्रमंत्री राब यांनी सायबरहल्ल्यांच्या वाढत्या धोक्याच्या मुद्यावर रशियासह चीन, उत्तर कोरिया व इराणवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘उत्तर कोरिया, इराण, रशिया व चीन हे एकाधिकारशाही राजवट असणारे देश आहेत. या राजवटी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर घातपात करण्यासाठी तसेच लुटीसाठी करीत आहेत. एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सेन्सॉरशिपसाठीही या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. म्यानमारसारख्या देशात जुंटा राजवटीने उचललेली पावले याचे ठळक उदाहरण आहे’, अशा शब्दात ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.

डॉमिनिक राब, इशारा, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री, सायबरहल्ला, ब्रिटन, रशिया, इंडो-पॅसिफिकयावेळी परराष्ट्रमंत्री राब यांनी गेल्या काही वर्षात जगभरात झालेल्या सायबरहल्ल्यांचा उल्लेख केला. रशियाने २०१७ साली चढविलेला ‘नॉटपेट्या सायबरहल्ला’, अमेरिकेच्या २०१६ व २०२० सालच्या निवडणुकांवर झालेले सायबरहल्ले, ब्रिटनमध्ये २०१९ सालच्या निवडणुकांमध्ये झालेले सायबरहल्ले तसेच मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवर झालेले हल्ले यांचा उल्लेख करून त्यांनी सायबरहल्ल्यांच्या वाढत्या व्याप्तीकडे लक्ष वेधले. ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील हल्ल्यांमुळे होणार्‍या परिणामांची जाणीव करून देताना ब्रिटीश परराष्ट्रमंत्र्यांनी, अमेरिकेतील पाईपलाईनवर झालेल्या हल्ल्याची माहितीही दिली.

वाढत्या सायबरहल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक पातळीबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडी उघडण्याचीही गरज असल्याचे आवाहन राब यांनी यावेळी केले. ब्रिटन यासाठी प्रयत्न करीत असून ‘जी७’ व नाटोसह इतर प्रमुख देशांशी याबाबत बोलणी चालू असल्याचा दावा त्यांनी केला. सायबरसुरक्षेसाठी ब्रिटन आफ्रिका व इंडो-पॅसिफिक देशांमध्ये दोन कोटी पौंडाहून अधिक गुंतवणूक करीत असल्याची माहितीही राब यांनी दिली.

रशियाकडून होणार्‍या सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर ब्रिटनने सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी कोरोना लसीची माहिती चोरण्यासाठी झालेल्या सायबरहल्ल्यांदरम्यानही ब्रिटनने रशियावर उघड आरोप केले होते. त्यापूर्वी रशियाची हेरगिरी व इतर कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन नेते व यंत्रणांवर सायबरहल्ले चढविण्याची योजनाही ब्रिटनने आखली होती.

leave a reply