रशियाने ‘नॉर्ड स्ट्रीम2’चा वापर धोरणात्मक शस्त्रासारखा करु नये

- जर्मनीचा इशारा

‘नॉर्ड स्ट्रीम2’

किव्ह/मॉस्को – बाल्टिक सागरी क्षेत्रातून जाणाऱ्या ‘नॉर्ड स्ट्रीम2’ इंधनवाहिनीचा वापर रशियाने त्यांची भूराजकीय उद्दिष्टे पूर्ण करणारे धोरणात्मक शस्त्र म्हणून करु नये, असा इशारा जर्मनीने दिला आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी नुकतीच रशिया व युक्रेन या दोन्ही देशांचा दौरा केला. युक्रेन दौऱ्यात पंतप्रधान वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, ‘नॉर्ड स्ट्रीम2’ इंधनवाहिनीचा उल्लेख अत्यंत धोकादायक ‘जिओपॉलिटिकल वेपन’ असा केला. या पार्श्‍वभूमीवर युक्रेनला आश्‍वस्त करताना जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी रशियाला इशारा दिल्याचे समोर आले आहे.

2014 साली क्रिमिआ ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनबरोबर पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, रशियाने युरोपला इंधनपुरवठा करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली होती. त्यातून ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून रशिया व जर्मनीतील महत्त्वाकांक्षी ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यात या इंधनवाहिनीचे सर्व काम पूर्ण होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या इंधनवाहिनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन निर्बंध लादले होते. मात्र अमेरिकेतील सत्ताबदलानंतर रशिया व जर्मनी या दोन्ही देशांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. अमेरिकी नेतृत्त्वाने काही मोजके निर्बंध कायम ठेवले असले, तरी प्रकल्पाला मान्यता दिल्याचे समोर आले आहे. गेल्याच महिन्यात या मुद्यावर अमेरिका व जर्मनीत करार झाल्याची घोषणाही करण्यात आली होती.

‘नॉर्ड स्ट्रीम2’युरोपिय महासंघाला पुरविण्यात येणाऱ्या नैसर्गिक इंधनवायुपैकी जवळपास 40 टक्के पुरवठा रशियाकडून केला जातो. रशियाने युक्रेनमधून जाणारी इंधनवाहिनी उभारली असून ही इंधनवाहिनी युक्रेनच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन मानले जाते. मात्र ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ इंधनवाहिनी सक्रिय झाल्यानंतर युक्रेनला दरवर्षी जवळपास दीड अब्ज डॉलर्सचा फटका बसणार आहे. त्याचबरोबर रशियाकडून युरोपला पुरविण्यात येणाऱ्या इंधनाच्या हिश्‍श्‍यातही वाढ होईल. याचा वापर रशियाकडून युरोपवरील दडपण वाढविण्यासाठी केला जाईल, असा दावा युक्रेनच्या पंतप्रधानांनी केला.

हा दावा करतानाच पंतप्रधान वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ इंधनवाहिनी हे रशियाच्या हातातील सर्वात धोकादायक ‘जिओपॉलिटिकल वेपन’ ठरेल, असे बजावले. युक्रेनच्या पंतप्रधानांनी उपस्थित केलेल्या या मुद्यावर बोलताना जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी, रशियाला इशारा देऊन अशा प्रकारे त्याचा वापर होऊ नये, असे खडसावले आहे. ‘नॉर्ड स्ट्रीम2’ इंधनवाहिनीचा वापर शस्त्रासारखा झाला तर पुन्हा रशियावर कठोर निर्बंध लादले जातील, असा इशारा मर्केल यांनी दिला. अमेरिका व जर्मनीमध्ये झालेल्या करारातही याचा उल्लेख आहे, याकडे मर्केल यांनी यावेळी लक्ष वेधले.

दरम्यान, अमेरिकेने गेल्याच आठवड्यात ‘नॉर्ड स्ट्रीम2’ इंधनवाहिनीशी निगडीत दोन रशियन कंपन्यांविरोधात निर्बंध लादल्याची माहिती समोर आली आहे. ‘नोबिलिटी’ व ‘कॉन्स्टन्टा’ अशी या कंपन्यांची नावे आहेत.

leave a reply