रशिया ‘सॅटन-२’ हायपरसोनिक अण्वस्त्राची चाचणी घेणार

- संरक्षण सूत्रांची माहिती

‘सॅटन-२’मॉस्को – पुढील काही महिन्यात तब्बल २०८ टन वजन व १८ हजार किलोमीटर्सचा पल्ला असलेल्या ‘सॅटन-२’ या हायपरसोनिक अण्वस्त्राच्या चाचण्या घेण्यात येतील, अशी माहिती रशियाच्या संरक्षण सूत्रांनी दिली आहे. जगातील कोणत्याही ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ला गुंगारा देण्याची क्षमता असलेल्या या अण्वस्त्राच्या निर्मितीला वेग देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी निर्देश दिले होतेे. गेल्या वर्षी एका मुलाखतीत पुतिन यांनी या क्षेपणास्त्राचा उल्लेखही केला होता.

‘२०२१ मध्ये सॅटन-२ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या तीन चाचण्या घेण्यात येतील. वायव्य रशियातील प्लेसेत्स्क स्पेस सेंटरवरून या चाचण्या होतील. चाचणी घेण्यात येणार्‍या क्षेपणास्त्रांचा पल्ला १८ हजार किलोमीटर्सहून अधिक आहे’, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली. पुढील वर्षी उर्वरित चाचण्या पार पाडल्यानंतर ‘सॅटन-२’ संरक्षणदलात सामील करण्यात येणार असून त्याच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, असे वृत्त रशियन वृत्तसंस्था ‘तास’कडून देण्यात आले आहे.

‘सॅटन-२’‘आरएस-२८ सॅरमट’ या नावानेही ओळखण्यात येणार्‍या या हायपरसोनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रात १० मोठे ‘थर्मोन्यूक्लिअर वॉरहेड्स’ किंवा १६ छोटे ‘वॉरहेड्स’ वाहून नेण्याची क्षमता आहे. या अण्वस्त्रात फ्रान्स किंवा अमेरिकतील टेक्सास प्रांताच्या आकाराच भूभाग उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे, असा दावा रशियन अधिकार्‍यांनी केला आहे. ‘सॅटन-२’मध्ये उत्तर तसेच दक्षिण ध्रुवावरून उडण्याचीही क्षमता असल्याचे रशियाने म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या दशकात रशियन संरक्षणदलांचे आधुनिकीकरण करण्याची योजना हाती घेतली होती. त्यानुसार, गेल्या काही वर्षात रशियाकडून सातत्याने नव्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या शस्त्रांची तसेच यंत्रणांची निर्मिती सुरू आहे. त्यात हायपरसोनिक तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या यंत्रणांचाही समावेश आहे. गेल्या तीन वर्षात पुतिन यांनी रशियाने विकसित केलेल्या नव्या क्षेपणास्त्रांचे आक्रमक प्रदर्शनही सुरू केले असून त्यामागे अमेरिका व युरोपिय देशांवर दडपण आणण्याचे धोरण असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या वर्षी रशियाने आपली नवी ‘न्यूक्लिअर डिटरंट पॉलिसी’ जाहीर केली होती. त्यात अण्वस्त्रांव्यतिरिक्त इतर पारंपारिक हल्ल्यांनाही अणुहल्ल्यानेच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता.

leave a reply