रशिया हा अमेरिका व नाटोच्या अस्तित्त्वासाठी धोका

- अमेरिकेच्या युरोपियन कमांडच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरून सातत्याने होणारी टीका आणि आर्थिक निर्बंध लादले जात असतानाही रशिया जगभरात इतरांना अस्थिर करणार्‍या घातक कारवाया करीत आहे. रशियाकडून युरोपात करण्यात येणार्‍या कारवायांची व्याप्तीही वाढली आहे. रशिया हा अमेरिका व अमेरिकेच्या युरोपातील मित्रदेशांच्या अस्तित्त्वासाठी दीर्घकालिन धोका आहे’, असा इशारा अमेरिकेच्या युरोपियन कमांडचे प्रमुख एअरफोर्स जनरल टॉड डी. वोल्टर्स यांनी दिला. अमेरिकेच्या ‘एअरफोर्स असोसिएशन’ने नुकतेच ‘एरोस्पेस वॉरफेअर सिम्पोसियम’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना नाटोचे लष्करी प्रमुख असणार्‍या जनरल टॉड डी. वोल्टर्स यांनी रशियाला लक्ष्य केले.

‘सोव्हिएत रशिया अस्तित्त्वात असताना त्यातील सदस्य देशांमध्ये आपला प्रभाव कायम राखण्यासाठी रशियाच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी अशा देशांमध्ये अथवा जवळ लष्करी तैनाती वाढवून दडपण टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. जागतिक सत्तास्पर्धेच्या काळात रशिया खाजगी लष्करी कंपन्यांसारख्या अपारंपारिक साधनांचा वापर करीत आहे. याचा वापर अमेरिकेचे मित्रदेश व भागीदारांना धमकविण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी व त्यांच्यात फूट पाडण्यासाठी केला जातो’, असा आरोप जनरल वॉल्टर्स यांनी केला.

यावेळी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जागतिक सत्तास्पर्धेकडेही लक्ष वेधले. सध्याचा काळ जागतिक सत्तास्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेचे रुपांतर सत्तासंघर्षात होऊ नये यासाठी अमेरिकेला या काळात जिंकणे आवश्यक असल्याचे जनरल वॉल्टर्स यांनी बजावले. अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी रशियासह चीनकडून आर्क्टिक क्षेत्राचे लष्करीकरण सुरू असल्याचाही आरोप केला. या दोन देशांकडून आर्क्टिकमध्ये सुरू असणार्‍या कारवाया, युरोपियन कमांडच्या माध्यमातून अमेरिका व युरोपिय मित्रदेशांची एकजूट किती महत्त्वाची आहे, हे दाखवून देणारे ठरते, असा दावाही त्यांनी केला.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या कारकिर्दीत रशियाकडून असणारा धोका हा महत्त्वाचा व प्राधान्यक्रमाचा मुद्दा राहिल, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून परराष्ट्र धोरणाबाबत वक्तव्य करताना, बायडेन यांनी आपण आपल्या पूर्वसुरीप्रमाणे रशियासमोर लोळण घेणार नाही, असा दावा केला होता. त्याचवेळी, रशियासारखा देश आपली लोकशाही उधळण्यासाठी हालचाली करीत आहे असा आरोप करून अमेरिकी नेतृत्त्वाला त्याविरोधात सक्रिय व्हावे लागेल, असेही बजावले होते.

त्यानंतर काही दिवसातच, आर्क्टिक क्षेत्रातील रशियाचे वाढते संरक्षणतळ व आक्रमक हालचाली रोखण्यासाठी अमेरिकेने नॉर्वेतील हवाईतळावर ‘बी-१ बॉम्बर्स’ तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर युरोपातील प्रमुख अमेरिकी अधिकार्‍यांनी रशियाच्या धोक्याबाबत इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply