रशियाच्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून डॉलरची हकालपट्टी करणार – अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव्ह यांची घोषणा

अँतोन सिल्युआनोव्हमॉस्को – रशियन सरकारकडे असलेल्या राखीव गंगाजळीतून उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून अमेरिकी डॉलरची हकालपट्टी करण्यात येईल, अशी घोषणा रशियाचे अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव्ह यांनी केली आहे. रशियात सुरू झालेल्या ‘सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम’मध्ये ही माहिती देण्यात आली. जानेवारी 2021 मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘नॅशनल वेल्थ फंड’मध्ये 184 अब्ज डॉलर्स इतका निधी असून त्यातील 35 टक्के गुंतवणूक अमेरिकी डॉलर्समध्ये आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या काही वर्षात अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी रशियाच्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलरचा हिस्सा कमी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने अब्जावधी डॉलर्स कमी करून त्याचे प्रमाण 10 टक्क्यांच्याही खाली आणल्याचे सांगण्यत येते. या पार्श्‍वभूमीवर ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून डॉलर पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते.

अँतोन सिल्युआनोव्ह‘पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत नॅशनल वेल्थ फंडमधील डॉलरचा हिस्सा शून्यावर आणण्यात येईल. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जातील. रशियाच्या मध्यवर्ती बँकेनेही या स्वरुपाची प्रक्रिया राबविली आहे’, या शब्दात अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव्ह यांनी निर्णयाची माहिती दिली. ‘रशियाच्या अर्थव्यवस्थेतून अमेरिकी डॉलरचा हिस्सा कमी करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. रशियाच नाही तर जगातील अनेक देश अमेरिकी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच हालचाली करीत आहेत. ही गोष्ट आता उघड्या डोळ्यांनीही दिसू लागली आहे’, या शब्दात रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी निर्णयाचे समर्थन केले आहे.

अँतोन सिल्युआनोव्हनव्या रचनेनुसार, ‘नॅशनल वेल्थ फंड’मध्ये युरोचा वाटा 40 टक्के व चीनच्या युआनचा वाटा 30 टक्के असणार आहे. सोन्यातील गुंतवणुकीचा हिस्सा तब्बल 20 टक्के असेल, असे सांगण्यात येते, तर ब्रिटीश पौंड व जपानच्या येनचा वाटा प्रत्येकी पाच टक्के राहणार आहे. आर्थिक संकटाच्या काळात तूट भरून काढण्यासाठी व इतर संबंधित उपाययोजनांसाठी ‘नॅशनल वेल्थ फंड’ची उभारणी करण्यात आली आहे. त्यामधील राखीव निधी बँक ऑफ रशियाच्या माध्यमातून, पारंपारिकदृष्ट्या सुरक्षित मालमत्ता म्हणून ओळखण्यात येणार्‍या सोन्यातील गुंतवणुकीसाठी वापरला जाऊ शकतो, असे आदेश रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांनी गेल्याच महिन्यात जारी केले होते.

रशियाकडील सोन्याचे राखीव साठे दोन हजार, 298 टनांवर जाऊन पोहोचले आहेत. रशियाकडील परकीय गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर गेली असून त्यातील सोन्याचे मूल्य तब्बल 130 अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. गंगाजळीतील सोन्याची टक्केवारी 22 टक्क्यांवर गेली असून, रशियन इतिहासात प्रथमच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सोन्याची टक्केवारी वाढली आहे.

leave a reply