रशियाचा आखातातील प्रभाव वाढत आहे

- अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकार्‍याचा इशारा

शिकागो – ‘१९७३ सालच्या अरब-इस्रायल युद्धानंतर पहिल्यांदाच रशिया आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का देऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आक्रमक प्रयत्न करीत आहे. रशियाच्या या प्रयत्नांना इराणकडून मिळत असलेले सहाय्य अमेरिकेसाठी धोकादायक ठरेल’, असा इशारा अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांनी दिला आहे. ट्रम्प प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणारे राजनैतिक अधिकारी जेम्स जेफ्री यांचा हा इशारा सौदीच्या माध्यमांनी उचलून धरला आहे.

‘वुड्रो विल्सन सेंटर’ या अमेरिकी अभ्यासगटात ‘मिडल ईस्ट प्रोग्राम’चे अध्यक्ष असलेल्या जेफ्री यांनी माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना बजावले. सिरियामध्ये सध्या सुरू असलेले युद्ध हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनाची सर्वात मोठी चूक होती. कारण या युद्धामुळे रशियाला सिरिया या आखाती देशामध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याची आयती संधी मिळाल्याची जाणीव जेफ्री यांनी करून दिली.

सिरियामधील युद्धानंतर रशियाने आपले लष्कर तैनात केले असून या ठिकाणी रशियाचे हवाई तसेच नौदल तळाची क्षमता वाढविली आहे. सिरिया युद्धामुळेच रशियाने या देशात आपली ‘एस-४००’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केल्याची आठवण जेफ्री यांनी करुन दिली. सिरियाप्रमाणे रशिया इराणमध्ये देखील आपले लष्करी तळ उभारण्याच्या विचारात असल्याचा दावा जेफ्री यांनी केला.

इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी उत्सुक असलेल्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाची जेफ्री यांनी खरडपट्टी काढली. बायडेन प्रशासन इराणबरोबर नव्याने करीत असलेल्या अणुकरारामुळे रशियाला आखातात आपले वर्चस्व वाढविणे अधिक सोपे जाईल, असे जेफ्री म्हणाले. अमेरिकेने इराणबरोबर अणुकरार केला तर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यासारखे आखातातील अमेरिकेचे अरबमित्र देश रशियाकडे पर्याय म्हणून पाहतील. काही दिवसांपूर्वी युएईने अमेरिकेला रशियाबरोबरच्या लष्करी सहकार्याबाबत विचार केला जाईल, असे सूचक विधान केले होते.

अमेरिकेने ‘एफ-३५’ या अतिप्रगत लढाऊ विमानांची विक्री रोखल्यानंतर युएईने ही धमकी दिली होती. इराणसोबत अणुकरार करण्यासाठी पावले उचलणार्‍या बायडेन प्रशासनाला जेफ्री यांनी याची जाणीव करुन दिली. सिरिया आणि इराण या दोन देशांपर्यंतच रशियाचा प्रभाव मर्यादित राहिलेला नाही. तर तुर्की आणि इराक या देशांमध्ये देखील रशिया आपला प्रभाव वाढवित चालल्याचे जेफ्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सिरियामध्ये रशियाने नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीबरोबर लष्करी आघाडी सुरू केल्याचे जेफ्री म्हणाले. त्याचबरोबर तुर्कीला ‘एस-४००’ हवाई सुरक्षा यंत्रणा देखील पुरविल्याचा दाखला दिला.

आखाती क्षेत्रातून अमेरिकेची लष्करी माघार ही रशिया व इराणमधील सहकार्याला नवी गती देणारी ठरेल. असे झाले तर इराणचा आत्मविश्‍वास दुणावेल आणि या क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांची सुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा जेफ्री यांनी दिला.

दरम्यान, १९७३ साली इस्रायल आणि अरब देशांमध्ये झालेल्या ऐतिहासिक युद्धाच्या आधी आखाती देशांमध्ये सोव्हिएत रशियाचा प्रभाव होता. तर आखाती क्षेत्रापलिकडे असलेल्या अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाचे सैनिकही तैनात होते. पण १९८०च्या दशकानंतर रशियाचा या क्षेत्रातील प्रभाव कमी झाला होता. मात्र बायडेन प्रशासनाचे चुकीचे पाऊल रशियासाठी आखाती क्षेत्र खुले करणारे ठरेल, याची जाणीव जेफ्री करून देत आहेत.

leave a reply