नायकू ठार झाल्याने सलाउद्दीन हादरला

इस्लामाबाद – रियाज नायकू ठार झाल्याने आपल्याला फार मोठा हादरा बसला आहे, अशी कबुली हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याने दिली. पाकिस्तानातील भरसभेत नायकू ठार झाल्याबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या सलाउद्दीन याने ‘इस वक्त दुश्मन का पलडा भारी है ‘ अशा शब्दात आपली दहशतवादी संघटना कमकुवत झाल्याचे मान्य केले. मात्र याचे खापर सलाउद्दीन याने पाकिस्तान सरकारच्या कचखाऊ धोरणावर फोडले आहे. जम्मू-काश्मीरच्या हंडवारा येथील दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले होते. याची जबाबदारी यावेळी सय्यद सलाउद्दीन यांनी स्वीकारली. हा हल्ला रियाजनेच घडविला होता ,असे सय्यद सलाउद्दीन पाकिस्तानातील सभेत म्हणाला. मात्र या नंतरच्या कारवाईत नायकू ठार झाला आणि त्याचा फार मोठा हादरा आपल्याला बसलेला आहे, असे सलाउद्दीन याने कापऱ्या आवाजात सांगितले. इतकेच नाही तर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे ८० दहशतवाद्यांना ठार केले आहे. याचीही कबुली सलाउद्दीनने यावेळी दिली.

हे सारे दहशतवादी उच्चशिक्षित होते, असा दावाही यावेळी सलाउद्दीन याने केला. तसेच त्यामुळे आपली दहशतवादी संघटना कमकुवत झाली असल्याचे हिजबुलच्या प्रमुखाने मान्य केले. पाकिस्तान सरकारचे कचखाऊ धोरण व आंतरराष्ट्रीय दडपण याची भीती याचा काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर दुष्परिणाम होत आहे, अशी खंत सलाउद्दीन याने व्यक्त केली. वेगळ्या शब्दात पाकिस्तानने आपल्या दहशतवादी कारवायांसाठी अधिक सहाय्य पुरविण्याची गरज असल्याची ओरड सलाउद्दीन करीत आहे. २०१६ साली हिजबुलचा कमांडर असलेला बुऱ्हाण वाणी याला भारतीय सुरक्षा दलाने ठार केल्यानंतर हाच सय्यद सलाउद्दीन भारताला युद्धाच्या धमक्या देत होता. लवकरच काश्मीरची नियंत्रण रेषा पुसून टाकली जाईल आणि सारे काश्मीर एक होऊन पाकिस्तानच्या अखत्यारीत येईल,असा दावा सलाउद्दीन याने त्यावेळी केला होता. मात्र मागच्या काही वर्षांपासून भारतीय लष्कर व सुरक्षा दलांनी तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाले असून यामुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे.

दहशतवादी व दहशतवाद्यांचे कमांडर यांचा अवघ्या काही दिवसात निकाल लावण्याचा धडाका सुरक्षा दलांनी लावला होता. त्यामुळे एखाद्या दहशतवाद्यांची कमांडर म्हणून नियुक्ती झाली की काही दिवसातच त्याला ठार करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध होत असते. यामुळे दहशतवादी संघटनामध्ये भरती होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यातच आता रियाज नायकू यासारखे दहशतवाद्यांचे म्होरके देखील ठार होऊ लागल्याने जम्मू-काश्मीर मधून दहशतवादी संघटनांचे पाळेमुळे उखडून काढली जात आहेत. आधीच्या काळात दहशतवाद्यांच्या भितीने सुरक्षा दलांना सहाय्य न करणारे काश्मिरी नागरिक आता सुरक्षा दलांना सहकार्य करू लागले आहेत. यामुळे दहशतवादविरोधी कारवाईला अधिकच बळ मिळत आहे.

leave a reply