सौदी व मित्रदेशांच्या येमेनमधील कारवाईत ८१ हौथी बंडखोर ठार

सना – गेल्या दोन दिवसात येमेनच्या मरिब प्रांतात झालेल्या संघर्षात हौथींचे ८१ बंडखोर ठार झाले. येमेनचे लष्कर आणि सौदी अरेबिया व मित्रदेशांविरोधात हौथी बंडखोर असा संघर्ष पेटला होता. येमेन व सौदीच्या आघाडीने गेल्या दहा दिवसात मरिबमध्ये हौथींवर केलेली ही दुसरी कारवाई ठरते. मरिब व्यतिरिक्त हौदेदा प्रांतातही हौथींनी संघर्ष सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.

दोन दिवसांपूर्वी हौथी बंडखोरांनी मरिब प्रांताची राजधानी मरिबचा ताबा घेण्यासाठी आसपासच्या भागावर हल्ले चढविले. अल-कासरा, मशाझ, हेलन, जबाल मुराद आणि राबाह या भागात तैनात असलेल्या येमेनी लष्कराच्या तुकडीला हौथींनी लक्ष्य केले. गेले दोन दिवस येमेनचे लष्कर आणि हौथी बंडखोर यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता. या ४८ तासांमध्ये हौथींनी किमान २० वेळा हल्ले चढविल्याचा दावा केला जातो.

हौथी बंडखोरांचे हे हल्ले मोडून काढण्यासाठी येमेनच्या लष्कराने तोफांचे हल्ले चढविले. तर सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी हवाई हल्ल्यांद्वारे हौथी बंडखोरांची कोंडी केली. या हल्ल्यांमध्ये ८१ बंडखोर ठार झाल्याची माहिती, येमेनच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल याह्या अल-हातेमी यांनी दिली. त्याचबरोबर हौथी बंडखोरांचा मोठा शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याचा दावा येमेनच्या लष्कराने केला.

येमेनच्या उत्तरेकडील बहुतांश भागावर हौथींनी फार आधीच ताबा घेतला होता. पण मरिब हा एकमेव इंधनसंपन्न प्रांत येमेनच्या लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे. मरिबचा ताबा मिळाल्यास, येमेनच्या अर्थव्यवस्थेवरील आपली पकड मजबूत होईल व राष्ट्राध्यक्ष हादी यांच्या सरकारची आर्थिक कोंडी करता येईल, असे हौथी बंडखोरांना वाटत आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून हौथी बंडखोरांनी मरिबचा ताबा घेण्यासाठी हल्ले वाढविले आहेत.

पण हौथी बंडखोर मरिबमधील हल्ल्यांमध्ये येमेनच्या लष्कराबरोबर स्थानिकांना देखील लक्ष्य करीत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष हादी करीत आहेत. लष्करावरील हल्ल्यात येमेनी नागरिकांचा देखील बळी जात असल्याची टीका येमेनचे सरकार व सौदी करीत आहे. पण इराणसमर्थक हौथी बंडखोरांच्या या कारवायांकडे आंतरराष्ट्रीय समुदाय दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सौदीने केला होता.

मरिबच नाही तर सोमवारपासून हौथी बंडखोरांनी येमेनच्या हौदेदा या भागातही हल्ले सुरू केले आहेत. रेड सीजवळ असणार्‍या या प्रांतात हौथींनी चढविलेल्या हल्ल्यांमध्ये १७ जण जखमी झाले असून यामध्ये महिला व मुलांचा समावेश असल्याची माहिती येमेनच्या सरकारने दिली. हौथी बंडखोरांनी येथील अत्तूहायता जिल्ह्यात पेरलेल्या भूसुरुंगावरुन मोटारीने प्रवास केल्यामुळे स्फोट झाला. हौथींनी लष्करासाठी पेरलेले भूसुरुंग जनतेचा जीव घेत?असल्याची टीका येमेनच्या सरकारने केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हौथी बंडखोरांचे येमेन तसेच सौदीवरील हल्ले वाढले आहेत. येमेनच्या सीमेजवळील सौदीच्या लष्करी चौक्या, हवाईतळ तसेच थेट पर्शियन आखाताजवळ असणार्‍या इंधन प्रकल्प आणि लष्करी तळांना हौथी बंडखोर लक्ष्य करीत आहेत. गेल्या आठवड्यातच हौथींनी सौदीच्या अराम्को कंपनीचे इंधनप्रकल्प व लष्करी तळाच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली होती. सौदीने पॅट्रियॉट हा हवाई सुरक्षा यंत्रणेच्या सहाय्याने हौथींचे हे हल्ले उधळले होते. पण गेल्या आठवड्यातच अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सौदीत तैनात केलेली ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्र यंत्रणा काढून घेतली. या निर्णयामुळे आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये चुकीचा संदेश गेला असून इराण, हौथी व इतर दहशतवादी संघटनांची धीटाई वाढू शकते, चिंता सौदीच्या माध्यमांनी व्यक्त केली होती.

leave a reply