कर्ज आणि इंधनासाठी पाकिस्तानला सौदी अरेबियाचे दरवाजे बंद

- पाकिस्तानचे लष्कर प्रमुख सौदी अरेबियाला जाणार

इस्लामाबाद – यापुढे पाकिस्तानला कर्ज मिळणार नाही आणि इंधन पुरवठाही केला जाणार नाही, असे सौदी अरेबियाने पाकिस्तानला निक्षून सांगितले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी काश्मीर मुद्द्यावर ‘ओआयसी’ची बैठक आयोजित न करण्यावरून सौदी अरेबियाला धमकी दिली होती. या धमकीतर सौदी अरेबीयाकडून उमटत असलेल्या प्रतिक्रिया पाहता दोन्ही देशांचे संबंध खूपच ताणले गेल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी मंगळवारी सौदी अरेबियाचे पाकिस्तानातील राजदूत नवाफ सईद अल-मलकी यांची भेट घेतली. मात्र या भेटीतूनही काहीच साध्य झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख ही नाराजी दूर करण्यासाठी सौदीला जाणार असल्याच्या बातम्या आहेत.

Pakistan-Saudi”काश्मीर मुद्यावर ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्ट्रीज’च्या (ओआयसी) परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित करावी, असे पाकिस्तान पुन्हा एकदा सांगत आहे. मात्र तसे न झाल्यास पाकिस्तान या मुद्यावर आपल्या बरोबर उभ्या राहणाऱ्या इस्लामिक देशांची बैठक बोलावण्यास बाध्य होईल ‘, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी म्हणाले होते. तसेच सौदी अरेबियाच्या विनंतीवरून आपण क्वालालंपूरमधील परिषदेत सहभागी झालो नव्हतो, याची आठवण करून देत काश्मीर प्रश्नी सौदी अरेबियाकडून इतकी अपेक्षा करू शकतो, असे विधान कुरेशी यांनी केले होते. ‘ओआयसी’चे अध्यक्षपद असलेल्या सौदी अरेबियाला कुरेशी यांनी याद्वारे काश्मीर प्रश्नी बैठक बोलवली नाही, तर ‘ओआयसी’मध्ये फूट पडेल आणि पाकिस्तान आपली स्वतंत्र संघटना तयार करील, अशी अप्रत्यक्ष धमकी दिली होती.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या धमकीनंतर सौदी अरेबियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या कित्येक वर्षाचे या दोन्ही देशांचे इंधन व्यापारी संबंधही यामुळे धोक्यात आले आहेत, हे सौदी अरेबियाकडून येत असलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. गेल्याच आठवड्यात सौदी अरेबियाने पाकिस्तानला आपले दिलेले कर्ज परत करण्यास सांगितले होते. त्यानंतर पाकिस्तानने चीनकडून पैसे घेऊन यातील एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड कशीबशी केली होती. यानंतर प्रकरण मिटेल, अशी पाकिस्तानला अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही सौदीने पाकिस्तानचा उधारीवर होणार इंधन पुरवठा थांबवला होता. आता पाकिस्तानला यापुढे आपल्याकडून कोणतेही कर्ज मिळणार नाही आणि इंधन पुरवठाही होणार नाही, असे सौदीने पाकिस्तानला स्पष्ट केल्याची बातमी येत आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या प्रचंड बिकट आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून सध्या नवे कर्ज मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या पाच महिन्यात ‘आयएमएफ’ने कोणत्याही देशांना नवे कर्ज दिलेले नाही. अशावेळी सौदी आपले कर्ज पाकिस्तानकडे परत मागत आहे. यामुळे पाकिस्तान मोठा अडचणीत आला आहे. कर्ज फेडले नाही, तर सौदी त्यांच्या देशात नोकरी करीत असलेल्या हजारॊ पाकिस्तानींना परत पाठवेल, ही भीती पाकिस्तानला सतावत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर जो ताण येईल यातून पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधिकच रसातळाला जाईल, अशी भीती आहे. त्यामध्ये सौदीने आता इंधन पुरवठाही थांबविला आहे.

यामुळे पाकिस्तानात परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नेहमी पाकिस्तानला सहाय्य करणाऱ्या सौदी अरेबियाला दुखावून राजनैतिक आणि धोरणात्मकदृष्ट्या घोडचूक कुरेशी यांनी केल्याचे आरोप पाकिस्तानात होत आहे. विरोधकांनी केलेला हल्लाबोल आणि त्यामध्ये माध्यमांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कुरेशी पुढे येण्याचे टाळत आहेत. तीन दिवसात दुसऱ्यांदा त्यांनी त्यांची पत्रकार परिषद रद्द केली आहे.

याआधी पाकिस्तानने तुर्की आणि मलेशियाबरोबर आपला स्वतंत्र गट तयार करण्याचा प्रयत्न केला होता. तुर्कीच्या नेतृत्वाखाली उभा राहणाऱ्या या गटाविरोधात सौदी अरेबियाने पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पाकिस्तानने या गटाच्या बैठकीला हजर राहणे टाळले होते. त्यामध्ये मलेशियात महाथीर यांचे सरकार जाऊन नवे सरकार आल्यावर या देशाचे धोरण बदलले. त्यामुळे सौदीच्या प्रभावाला आव्हान देणारा हा गट आपोआपच विसर्जित झाला होता.

मात्र पाकिस्तानने असे प्रयत्न पुन्हा करण्याचे संकेत दिल्यावर सौदी अरेबिया भडकल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनच्या पाठबळावर सौदी अरेबियाला दुखवण्याचे धारिष्ट पाकिस्तान दाखवत असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. इराण आणि काश्मीर मुद्यावरून सौदी अरेबिया आणि पाकिस्तानात मतभेद होते. त्यामध्ये तुर्कीकडे पाकिस्तानचा कल वाढल्याची सौदी अरेबीयाकडून उमटलेली ही प्रतिक्रिया आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply