सौदीच्या न्यायालयाकडून हमासच्या ६९ सदस्यांना तुरुंगवासाची शिक्षा

तुरुंगवासाची शिक्षारियाध – सौदी अरेबियाच्या न्यायालयाने हमास या दहशतवादी संघटनेचे सदस्य असलेल्या ६९ जणांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यात हमासचे सौदी अरेबियातील माजी प्रतिनिधी मोहम्मद अल खुदैरी व त्यांचा मुलगा हानी यांचा समावेश आहे. हमासने या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून सौदीच्या न्यायालयाचे आदेश दुर्दैवी व अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. काही विश्‍लेषकांनी सौदीचा निर्णय म्हणजे हमास व इराणमधील वाढत्या जवळीकीचा परिणाम असल्याचा दावा केला आहे.

सौदी अरेबियातील ‘क्रिमिनल कोर्ट’ने हमासच्या ६९ सदस्यांना तीन ते २१ वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली आहे. यात मोहम्मद अल खुदैरी व त्यांचा मुलगा हानी यांच्यासह जमाल अल-दाहुदी, शरीफ नसरल्लाह, अली अल-शेव्की व अयमान अल-अक्कद यांचाही समावेश असल्याचे हमासकडून सांगण्यात आले. शिक्षा सुनावण्यात आलेल्या सदस्यांमध्ये पॅलेस्टिनी तसेच जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. सौदी अरेबियाने २०१८ साली केलेल्या एका कारवाईत हमासच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड केली होती.

तुरुंगवासाची शिक्षात्यानंतर २०१९ सालापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. या कारवाईनंतर सौदी अरेबिया व हमासमधील संबंध अधिकच बिघडल्याचे सांगण्यात येते. काही महिन्यांपूर्वी इस्रायलने गाझात केलेल्या कारवाईनंतर हमासने सौदीबरोबरील संबंध पुन्हा सुधारण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या महिन्यात हमासचे नेते खालेद मेशाल यांनी सौदीच्या वृत्तवाहिनीला मुलाखतही दिली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात हमासचे प्रमुख इस्माईल हनिया यांनी, सौदी हमासच्या सदस्यांबाबत योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.

मात्र हमासची अपेक्षा फोल ठरल्याचे सौदी न्यायालयाच्या निर्णयावरून दिसून येत आहे. सौदी अरेबियाने अधिकृत पातळीवर याबाबत कोणतीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. हमासने मात्र निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘सौदी अरेबियात राहणार्‍या पॅलेस्टिनी व जॉर्डनच्या नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षा सुनावली जाणे तुरुंगवासाची शिक्षाधक्कादायक आहे. बहुतेक जणांना कठोर व अन्यायकारक शिक्षा सुनावण्यात आली असून, आम्ही त्याची निंदा करतो. त्यांनी त्यांच्या लोकांच्या समर्थनाचे आपले कर्तव्य पार पाडले. ते करीत असताना त्यांनी सौदीच्या राजवटीविरोधात अथवा जनतेविरोधात काहीही केलेले नव्हते’, असे टीकास्त्र हमासने सोडले आहे.

पॅलेस्टाईनमधील ‘इस्लामिक जिहाद मुव्हमेंट’ या गटानेही सौदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविला आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांनीही सौदीच्या निर्णयावर टीका केली. इस्रायली आक्रमणाविरोधात संघर्ष करीत असल्यानेच हमासविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचा दावा केला. सौदीने हमासच्या सदस्यांची सुटका करावी, त्याबदल्यात आम्ही सौदी लष्करी अधिकार्‍यांना सोडू, असा प्रस्ताव हौथी बंडखोरांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम अल रईसी यांनी पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला हमासचे नेते हनिया यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते. ही बाब सौदी राजवटीने गांभीर्याने घेतली असून हमासच्या सदस्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा त्याचाच भाग असू शकतो, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply