अरुणाचल प्रदेशमध्ये सुरक्षादलांच्या कारवाईत सहा दहशतवादी ठार

चिनी बनावटीची शस्त्र सापडली

इटानगर – अरुणाचल प्रदेशमध्ये म्यानमार सीमेनजीक सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ‘एनएससीएन(आयएम)’चे सहा दहशतवादी ठार झाले. या चकमकीत आसाम रायफल्सचा एक जवान जखमी झाला आहे. चकमकीदरम्यान प्रचंड मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून यामध्ये चिनी बनावटीचे शस्त्रांचाही समावेश आहे. त्यामुळे ईशान्य भारतातल्या दहशतवादी संघटनांना चीनकडून सहाय्य मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Arunachal-Pradesh-Terroristsइटानगरपासून ३१० किलोमीटर दूर म्यानमार सीमेवरील नगिनु गावाजवळील घनदाट जंगलात ‘ नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड- आयसाक-मुवाह’, ‘एनएससीएन(आयएम)’ या संघटनेचे दहशतवादी लपून बसले होते. सुरक्षा यंत्रणांना याबाबत खबर मिळाल्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षादलांनी संयुक्त शोध मोहीम हाती घेतली. भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि अरुणाचल प्रदेश पोलीस या मोहिमेत सहभागी झाले होते. सुरक्षादलांनी आपल्याला घेरल्याचे लक्षात आल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यानंतर उडालेल्या चकमकीत ‘एनएससीएन’चे सहा दहशतवादी ठार झाले. चकमकीत आसाम रायफल्सचा एक जवान जखमी झाला. चकमकीदरम्यान काही दहशतवादी पळून गेले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. त्यामुळे ही मोहीम अद्याप संपली नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

चकमकीच्या ठिकाणावरून सहा लाँग रेंज वेपन्स, चार एके ४७ रायफल्स, दोन चायनीज एमजी रायफल, पाच किलो स्फोटके , होममेड बॉम्ब, आयईडी आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामुळे फार मोठा हल्ल्याचा कट उधळला गेला. यामागे चीनचा हात असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याचा तपास एनआयकडे सोपविला जाणार असल्याचे वृत्त आहे. एनएससीएन (एम) ही संघटना नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये कार्यरत आहे.

दरम्यान, ईशान्य भारतात कारवाया करणाऱ्या सर्वच दहशतवादी संघटनांना चीनकडून सहाय्य मिळते हे याधीही स्पष्ट झाले आहे. मात्र गेल्या चार पाच वर्षात सुरक्षा यंत्रणांनी या संघटनांचे अस्तित्व संपवत आणले आहे. कित्येक दहशतवादी चकमकीत ठार झाले आहेत. काही दहशतवादी संघटना आणि त्यांचे प्रमुख नेते शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात आले आहेत. बांगलादेश आणि म्यानमारमधील या दहशतवादी संघटनांचे तळ तेथील यंत्रणा व लष्कराच्या मदतीने नष्ट केले आहेत. यामध्ये या संघटनांचे नेतेही ठार झाले असून काहींनी शरणागती पत्करली आहे. यामुळे ईशान्य भारतातील हिंसक दहशतवादी कारवाया ७० टक्क्यांनी घटल्याचा अहवाल तीन महिन्यापूर्वीच उघड झाला होता.

leave a reply