अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी तैवान दौऱ्यावर दाखल

तैपेई – अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी केथ क्रॅक गुरुवारी दुपारी तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यावर दाखल झाले. अवघ्या महिन्याभरात अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तैवानला भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेचे आरोग्यमंत्री अलेक्स अझार यांनी तैवानला भेट दिली होती. त्यानंतर परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांना तैवानमध्ये धाडून अमेरिकेने चीनला कठोर संदेश दिल्याचे मानले जाते. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या या भेटीवर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही कृती चिथावणीखोर असल्याचा इशारा दिला आहे.

तैवान दौऱ्यावर दाखल

१९७९ साली अमेरिकेने तैवानशी राजनैतिक संबंध तोडून चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला मान्यता दिली होती. असे असले तरी अमेरिकेने गेली चार दशके अनौपचारिक पातळीवर तैवानबरोबरील संबंध कायम राखले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही वर्षांत हे धोरण बदलण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. कोरोनाची साथ व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून साऊथ चायना सी तसेच हॉंगकॉंगमध्ये चालू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तैवानबरोबरील जवळीक अधिक वाढविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्यमंत्री अझार व त्यापाठोपाठ परराष्ट्र अधिकारी क्रॅक यांचा तैवान दौरा त्याचे स्पष्ट संकेत ठरतात.

क्रॅक यांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेने तैवानचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष ‘ली तेंग हुई’ यांच्याप्रति संवेदना व्यक्त करण्याचे कारण पुढे केले आहे. मात्र प्रत्यक्षात केथ क्रॅक अमेरिका व तैवानमधील आर्थिक तसेच व्यापारी बैठकीची पूर्वतयारी म्हणून दाखल झाल्याचे समोर येत आहे. त्यांच्याबरोबर परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतर विभागातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आहे. हे शिष्टमंडळ शुक्रवारी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेणार आहेत. त्याव्यतिरिक्त अमेरिकी शिष्टमंडळ तैवानमधील इतर विभागाचे मंत्री तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तैवान दौऱ्यावर दाखल

अमेरिकी शिष्टमंडळाच्या या दौऱ्यावर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमेरिका व तैवानमधील कोणत्याही राजनैतिक देवाणघेवाणीला चीनचा ठाम विरोध आहे. क्रॅक यांना तैवान दौऱ्यावर पाठवून अमेरिकेने वन चायना धोरणाचे उल्लंघन केले आहे. अमेरिकेची कृती चिथावणी देणारी असून त्याने अमेरिका चीन संबंधाना धक्का बसला आहे. चीन त्याला योग्य प्रत्युत्तर देईल’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचा तैवान दौरा सुरू असतानाच, अमेरिकेकडून तैवानला नवी शस्त्रास्त्रे देण्यासंदर्भात वृत्त समोर आले आहे. अमेरिकेने यापूर्वीच तैवानशी ‘एफ-१६’ लढाऊ विमाने देण्याबाबत करार केला आहे. त्याचवेळी तैवानमधील पॅट्रिऑट मिसाईल्स’ यंत्रणा अद्ययावत करण्याचाही निर्णय घेतला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला तैवान अमेरिकेकडून हार्पून क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी करत असल्याचेही सांगण्यात आले होते. अमेरिकेने तैवानला टॉर्पेडो देण्यास मान्यता दिल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र आता नवी क्षेपणास्त्र तसेच रॉकेट यंत्रणा व माईन्स तसेच ड्रोन्स देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती अमेरिकेतील सूत्रांनी दिली आहे.

leave a reply