इथिओपिया-सुदान सीमेवरील नदीत मृतदेह सापडल्याने खळबळ

आदिस अबाबा – इथिओपिया-सुदान सीमेवरील नदीत ४०हून अधिक मृतदेह वाहून आल्याचे समोर आले असून या घटनेने खळबळ उडाली आहे. बहुतांश मृतदेह संघर्षग्रस्त तिगरे प्रांतातील नागरिकांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने तिगरे भागात सुरू असलेल्या संघर्षाची वाढती तीव्रता समोर आली असून, इथिओपिया सरकारने सदर घटनेसाठी तिगरेतील सशस्त्र गटांनाच जबाबदार धरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना व अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने या मुद्यावरून इथिओपिया सरकारला धारेवर धरले आहे.

इथिओपिया-सुदान सीमेवरील नदीत मृतदेह सापडल्याने खळबळइथिओपिया व सुदानदरम्यान असणार्‍या हुमेरा नदीत मृतदेह आढळले आहेत. सुदानमधील स्वयंसेवी गट व डॉक्टरांनी, जवळपास ४३ मृतदेह मिळाल्याची माहिती दिली आहे. अनेक मृतदेहांचे हात बांधलेले असून शरीरावर जखमेच्या खुणाही आढळल्या आहेत. काही मृतदेहांवरील अवयव कापलेले आढळल्याचेही सांगण्यात येते. हे सर्व मृतदेह तिगरेवंशियांचेच असल्याचे मानले जाते. या घटनेतून इथिओपियाच्या लष्कराचे भीषण क्रौर्य दिसून आल्याचे दावे करण्यात येत आहेत.

मात्र इथिओपिया सरकारने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. नदीत वाहून गेलेले मृतदेह तिगरेतील बंडखोर संघटनांनीच जाणुनबुजून फेकले असल्याचा आरोप इथिओपिया सरकारच्या प्रवक्त्यांनी केला. इथिओपिया सरकारची बदनामी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र सशस्त्र बंडखोर संघटनांनी सदर आरोप फेटाळले आहेत.

इथिओपिया-सुदान सीमेवरील नदीत मृतदेह सापडल्याने खळबळबंडखोर संघटनांवर आरोप करणार्‍या इथिओपिया सरकारने तिगरेत सक्रिय असणार्‍या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी गटांवरही बंदी घातली आहे. संघर्षग्रस्त तिगरे प्रांत मानवतावादी संकटाच्या उंबरठ्यावर असून २० लाखांहून अधिक नागरिकांना दुष्काळ व उपासमारीच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेने नुकताच दिला होता. या पार्श्‍वभूमीवर तिगरेत मोठ्या प्रमाणावर मानवतावादी सहाय्याची गरज असताना घातलेली ही बंदी लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. बंदी घालताना परदेशी गट चुकीची माहिती पसरवित असल्याचे तसेच तिगरेतील सशस्त्र गटांना शस्त्रपुरवठा करीत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

इथिओपिया-सुदान सीमेवरील नदीत मृतदेह सापडल्याने खळबळइथिओपियाचे पंतप्रधान अबि अहमद यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिगरे प्रांतावर हल्ला चढविला होता. या कारवाईसाठी त्यांनी शेजारी देश इरिट्रिआचेही सहाय्य घेतले होते. काही महिन्यांच्या संघर्षानंतर पंतप्रधान अहमद यांनी तिगरे प्रांतावर ताबा मिळविल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल असल्याचे गेल्या काही आठवड्यांमधील संघर्षातून समोर आले आहे.

तिगरेतील स्थानिक बंडखोर गटांनी राजधानी मेकेलसह प्रांतातील महत्त्वाची शहरे ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. इथिओपियाच्या शेकडो जवानांना युद्धबंदी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या नामुष्कीच्या पार्श्‍वभूमीवर इथिओपिया सरकारने काही दिवसांपूर्वी संघर्षबंदीची घोषणा केली आहे. मात्र बंडखोर गटांनी संघर्षबंदीस नकार दिला असून तिगरेवर संपूर्ण ताबा मिळेपर्यंत संघर्ष कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान तिगरेतील गटांनी अम्हारा प्रांतातील एका भागावर ताबा मिळविल्याचे वृत्त नुकतेच समोर आले असून, त्यामुळे संघर्षाती तीव्रता अधिकच वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply