रशिया, चीन व इराणच्या गुप्तहेरांपासून ब्रिटनच्या सुरक्षेला गंभीर धोका

- ब्रिटनचे गुप्तचर प्रमुख केन मॅक्कलम यांचा इशारा

ब्रिटनच्या सुरक्षेलालंडन/मॉस्को/बीजिंग – रशिया, चीन व इराणकडून होणार्‍या हेरगिरीपासून ब्रिटनच्या सुरक्षेला धोका आहे. हा धोका दहशतवादाच्या धोक्याइतकाच गंभीर ठरतो, असा इशारा ब्रिटनचे गुप्तचर प्रमुख केन मॅक्कलम यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच लंडन युनिव्हर्सिटीवर इराणी हॅकर्सच्या गटाने सायबरहल्ला चढवून माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर मॅक्कलम यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेत आहे.

बुधवारी झालेल्या थेम्स हाऊसमधील मुख्यालयात झालेल्या बैठकीत ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5’चे प्रमुख केन मॅक्कलम यांनी ब्रिटनच्या जनतेला सावधगिरीचा इशारा दिला. सिरिया व अफगाणिस्तानातून येणार्‍या दहशतवाद्यांचा धोका आहेच, पण त्याहून महत्त्वाची गरज रशिया, चीन व इराणपासून असणारा धोका ओळखण्याची आहे, असे मॅक्कलम यांनी बजावले. त्याचववेळी ब्रिटनला असणार्‍या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही आमची क्षमता वाढवित असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘गेली दोन दशके गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादविरोधी मोहिमेवर अधिक भर दिला होता. या काळात देशाला असलेल्या धोक्यांकडील लक्ष कमी झाले होते’, अशी कबुलीही मॅक्कलम यांनी यावेळी दिली.

‘परदेशी हेरांकडून ब्रिटनमध्ये हत्या घडविण्यात येत असून, संवेदनशील तंत्रज्ञान चोरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. सार्वजनिक स्तरावर लोकप्रिय असणार्‍या व्यक्तींना भ्रष्ट करण्याचे, समाजात फूट पाडण्याचे तसेच सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांवर हल्ले चढविण्याचे कट आखले जात आहेत’, याकडे गुप्तचर प्रमुखांनी लक्ष वेधले. 2018 साली ब्रिटनमधील माजी रशियन अधिकारी व त्याच्या मुलीवर झालेल्या रासायनिक हल्ल्यानंतर ‘एमआय5’ने हत्या व इतर कारवायांचे अनेक कट उधळून लावल्याचा दावाही मॅक्कलम यांनी केला.

ब्रिटनच्या सुरक्षेलाब्रिटीश जनतेत नैराश्याची भावना निर्माण होईल किंवा दैनंदिन व्यवहारांमध्ये अडचणी येतील, यासारख्या गोष्टी परदेशी गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात येतील, असे ‘एमआय5’च्या प्रमुखांनी बजावले. याबाबत ब्रिटीश जनतेत अधिक जागृती करून या धोक्यांची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे, असे आवाहनही मॅक्कलम यांनी यावेळी केले. ब्रिटीश जनतेने भीती बाळगण्याचे कारण नाही, पण धोक्यांची माहिती असणे गरजेचे आहे, असे गुप्तचर प्रमुख यावेळी म्हणाले. परदेशी यंत्रणा वर्षानुवर्षांचे ब्रिटीश संशोधन व गुंतवणूक धुळीला मिळवू शकतात, असा इशारा गुप्तचर प्रमुख केन मॅक्कलम यांनी दिला.

गेली काही वर्षे ब्रिटन व रशियामधील संबंधांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. काही दिवसांपूर्वीच ब्रिटीश युद्धनौकेच्या क्रिमिआतील मोहिमेच्या मुद्यावरून दोन देशांमधील तणाव चिघळल्याचे समोर आले होते. त्यापूर्वी मे महिन्यात संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी, रशिया हा ब्रिटनच्या सुरक्षेसाठी असलेल्या पहिल्या क्रमांकाचा धोका आहे, असे बजावले होते. गेल्या वर्षी ब्रिटनची गुप्तचर व सुरक्षायंत्रणा ‘जीसीएचक्यू’चे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी, चीन हा ब्रिटनसाठी असलेला मोठा धोका असल्याचा इशारा दिला होता. तर ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’कडून देण्यात आलेल्या इशार्‍यात, इराणच्या यंत्रणा व गट सायबरहल्ल्यांच्या माध्यमातून घातपात तसेच संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले होते.

leave a reply