अस्थीर, असुरक्षित अफगाणिस्तानपासून भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका

- अफगाणिस्तानचे राजदूत फरिद ममुन्दजई

नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील अस्थैर्य केवळ या देशाच्या सीमेत मर्यादित राहत नाही. त्याचा शेजारी देशांवरही प्रभाव पडतो, असे सांगून अफगाणिस्तानच्या राजदूतांनी भारताला सावधानतेचा इशारा दिला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनीही जवळपास अशाच शब्दात अफगाणिस्तानातील अस्थैर्यवर चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातील या घडामोडींमुळे भारताच्या सुरक्षेसमोर गंभीर आव्हान खडे ठाकणार असल्याचे इशारे याआधी सामरिक विश्‍लेषकांनी दिले होते. त्यामुळे अफगाणिस्तानबाबत तटस्थ राहण्याचे धोरण भारताला परवडणारे नाही, याचीही जाणीव सामरिक विश्‍लेषक भारताला करून देत आहेत.

अस्थीर, असुरक्षित अफगाणिस्तानपासून भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका - अफगाणिस्तानचे राजदूत फरिद ममुन्दजई‘युएस एक्झिट फ्रॉम अफगानिस्तान: रिर्पकर्शन्स फॉर अफगानिस्तान, इंडिया, रिजन अँड युएस’ या विषयावरील वेबिनारमध्ये अफगाणिस्तानचे राजदूत फरिद ममुन्दजई बोलत होते. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे. एकदा का अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला, की हा देश दहशतवाद्यांचे आगर बनेल. खतरनाक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबरोबर तालिबानचा संबंध आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात तालिबान व अल कायदामध्ये सहकार्य असल्याचे बजावले होेते. ओसामा बिन लादेन याचा मुलगा अमीर मुल्ला अख्तर महमूद मसूद याची अल कायदाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली त्यावेळी तालिबानचे नेते उपस्थित होते, याकडे अफगाणिस्तानच्या राजदूतांनी लक्ष वेधले.

तालिबानबरोबरच अल कायदाची अफगाणिस्तानातील उपस्थिती पाश्‍चिमात्य देशांसाठी घातक बाब ठरेल. भारताच्या सुरक्षेवरही याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव राजदूत ममुन्दजई यांनी करून दिली. अफगाणिस्तानात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात चार हजार जणांचा बळी गेला व तीन लाख जण विस्थापित झाले आहेत, अशी खंत राजदूत ममुन्दजई यांनी करून दिली. अशा परिस्थितीत तालिबानकडे अफगाणिस्तानची सत्ता आली, तर गेल्या वीस वर्षात अफगाणिस्तानने जे काही कमावले आहे, ते गमावण्याची वेळ येईल, असा इशारा ममुन्दजई यांनी दिला.

अस्थीर, असुरक्षित अफगाणिस्तानपासून भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका - अफगाणिस्तानचे राजदूत फरिद ममुन्दजईयाबरोबरच ममुन्दजई यांनी तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातील भारताचे प्रकल्प चीनच्या हाती सोपविले जातील, असे बजावले आहे. चीन अफगाणिस्तानात सक्रीय भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक आहे. तसे संकेत चीनकडून सातत्याने दिले जात असून तालिबानने हिंसा रोखावी, असे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतेच केले होते. पाकिस्तानचा वापर करून चीन अफगाणिस्तानची नैसर्गिक संपत्ती लुबाडण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे, असे आरोप पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांनी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानच्या राजदूतांनी याबाबत भारताला दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

दरम्यान, भारताने तालिबानशी चर्चा करून अफगाणिस्तानातील आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भारताने अफगाणिस्तानातील संघर्षात तटस्थ भूमिका स्वीकारून काबुलच्या सरकारला सहाय्य करण्याचे टाळावे, अशी मागणी तालिबान करीत आहे. पण तालिबानवर विश्‍वास ठेवता येणार नाही, असे अफगाणिस्तानचे सरकार भारताला बजावत आहे. तसेच तालिबानच्या विरोधात अफगाणिस्तानला भारताच्या लष्करी सहाय्याची आवश्यकता असल्याचे अफगाणी सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे.

leave a reply