अफगाणिस्तानातील परिस्थिती चिघळत चालली आहे

- भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

अफगाणिस्तानातील परिस्थितीनवी दिल्ली – अफगाणिस्तानातील परिस्थिती चिघळत चालल्याचा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिला. कतारच्या परराष्ट्र विभागाचे अफगाणिस्तानचे विशेषदूत ‘मुतकाल बिन माजेद अल-क्वहतानी’ यांच्याबरोबरील चर्चेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हा इशारा दिला. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघाने अफगाणिस्तानसाठी नेमलेल्या विशेषदूत देबोरा लिऑन्स यांनी देखील अफगाणिस्तानातील संघर्ष आता खतरनाक टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे बजावले आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारतात आलेले कतारच्या परराष्ट्र विभागाचे अफगाणिस्तानचे विशेषदूत ‘मुतकाल बिन माजेद अल-क्वहतानी’ यांची भेट घेतली. अमेरिका व तालिबानमध्ये शांतीचर्चा घडवून आणण्यात कतारचा सहभाग होता. तालिबानने कतारमध्येच आपले कार्यालय सुरू केले असून इथे प्रतिनिधीही नेमले आहेत. तसेच अफगाणिस्तानमधील शांतीप्रक्रियेसाठी कतार अत्यंत प्रभावी भूमिका पार पाडत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कतारच्या विशेषदूतांबरोबरील चर्चा महत्त्वाची मानली जाते.

या चर्चेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक परिस्थिती चिघळत चालल्याचा इशारा दिला. तसेच कतारच्या विशेषदूतांसमोर अफगाणिस्तानबाबत भारताचा दृष्टीकोन मांडण्यात आला व या क्षेत्राच्या चिंताही या चर्चेत स्पष्ट करण्यात आल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. ‘स्थीर व शांत अफगाणिस्तानसाठी या देशाच्या सर्वच समाजगटांना संरक्षण व प्रगतीची संधी मिळायला हवी’, असे जयशंकर पुढे म्हणाले.

दरम्यान, कतारला भेट देण्याच्याही आधी परराष्ट्रमंत्री जयशंकर इराणच्या दौर्‍यावर गेले होते. इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या शपथग्रहण समारोहाला परराष्ट्रमंत्री जयशंकर उपस्थित होते. यानंतर जयशंकर यांची राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यात चर्चा पार पडली. यावेळी अफगाणिस्तानात सुरक्षा प्रस्थापित व्हावी, यासाठी भारत बजावत असलेल्या भूमिकेचे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वागत केले. तसेच भारत व इराण अफगाणिस्तानसाठी विधायक व उपयुक्त भूमिका पार पाडू शकतील, असा विश्‍वास इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या इराणभेटीने पाकिस्तानची धडधड वाढली होती. भारत इराण व रशियाला हाताशी धरून अफगाणिस्तानात ‘ग्रेट गेम’ करीत असल्याचा आरोप काही पाकिस्तानी विश्‍लेषक करू लागले होते. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेल्या विशेषदूत देबोरा लिऑन्स यांनी अफगाणिस्तानातील संघर्षावरून आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध केले आहे.

अफगाणिस्तानातील संघर्ष खतरनाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. हा देश विध्वंसाच्या उंबरठ्यावर असून या विनाशापासून सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानला वाचवावे’, असे कळकळीचे आवाहन देबोरा लिऑन्स यांनी केले. महिनाभरात झालेल्या हिंसाचारात हजाराहून अधिक अफगाणींचा बळी गेला आहे. तसेच या देशाच्या अर्ध्या जनसंख्येला मानवी सहाय्याची आवश्यकता भासत आहे, असे सांगून देबोरा यांनी अफगाणिस्तानातील विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली.

सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना भारताने अफगाणिस्तानातील रक्तरंजित संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. तसेच दहशतवाद्यांची अभयारण्ये नष्ट झाल्याखेरीज अफगाणिस्तानात शांतता नांदणार नाही. त्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय व सुरक्षा देणार्‍यांना जबाबदार धरावे लागेल, असे सुरक्षा परिषदेत भारताने बजावले होते. तर आपल्या देशातील हिंसाचाराला तालिबान कारणीभूत असून तालिबानच्या मागे पाकिस्तानचे समर्थन असल्याचा धडधडीत आरोप अफगाणिस्तानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी केला होता.

leave a reply