बलोचिस्तानमधील स्फोटात पाकिस्तानचे सहा जवान ठार

इस्लामाबाद – बलोचिस्तानमध्ये झालेल्या भुसुरूंग स्फोटात पाकिस्तानी लष्कराच्या मेजरसह सहा जवान ठार झाले. पाकिस्तान-इराण सीमेपासून 14 किमी अंतरावर हा स्फोट झाला. रिमोट कंट्रोल डिव्हाइसद्वारे हा स्फोट घडविण्यात आला असून याची जबाबदारी ‘बलोच लिबरेशन आर्मी’ या बंडखोर संघटनेने घेतली आहे.

पाकिस्तान-इराण सीमेपासून १४ किलोमीटर अंतरावर बेलूदा भाग आहे. इथल्या मकरान टेकडीलगतच्या परिसरातील काही रस्त्यांचा वापर बलोच बंडखोर संघटनाकडून केला जातो. त्याची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या ‘फ्रंटीयर कोर साऊथ बलुचिस्तान’चे जवान गेले होते. या ठिकाणाहून परतत असताना हा भुसुरूंगाचा स्फोट झाला व त्यात मेजरसह पाकिस्तानचे सहा जवान ठार झाले. ठार झालेल्या पाकिस्तानी मेजरचे नाव नदीम अब्बास भट्टी असे आहे.

या हल्ल्याची जबाबदारी ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने स्वीकारली आहे. तसेच बलोचिस्तानातील इतर चार बंडखोरी संघटनांची संयुक्त संघटना असलेल्या ‘बलोच राजी अजोई संगर’ या संघटनेनेही हा हल्ला आपण घडविल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात ठार झालेला पाकिस्तानी मेजर पाकिस्तानी लष्कराकडून बालोची नेत्यांच्या हत्या घडविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कथित ‘डेथ स्कॉड’चा निर्माता होता असा दावा, ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने केला आहे. तसेच बलोचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठविणाऱ्या संघटनांविरोधात अमली पदार्थांच्या तस्कर टोळ्यांना शास्त्रे पुरविण्यातही या लष्करी अधिकाऱ्याचा हात होता, असा दावाही ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने केला आहे.

पाकिस्तानचे लष्कर बलोचिस्तानच्या जनतेवर अनन्वित अत्याचार करीत असून कित्येक बलोची तरूण बेपत्ता आहेत. हजारो बलोची कार्यकर्त्यांचा पाकिस्तानने बळी घेतला आहे. पाकिस्तानच्या सरकारी दस्तावेजात त्यांचा उल्लेख या तरुणांची नोंद बेपत्ता अशी करण्यात येते.

या अन्यायाच्या विरोधात बलोच बंडखोर संघटनांनी संघर्ष पुकारला असून पाकिस्तानी लष्कराला धडा शिकविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या जवान व अधिकाऱ्यांवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. शुक्रवारी बलोच बंडखोर संघटनेने घडविलेला भूसुरुंग स्फोट हा बलोच जनतेच्या प्रतिकाराचा भाग ठरत असल्याचे दिसते.

leave a reply