उघुरवंशियांच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून विशेष बैठक

- चीनची तीव्र नाराजी

न्यूयॉर्क/बीजिंग – संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून झिंजिआंग प्रांतातील उघुरवंशियांच्या मुद्यावर आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप चीनने केला आहे. येत्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे चीन चांगलाच अस्वस्थ झाला असून संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सदस्य देशांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘जी७’ गटाने उघुरवंशियांच्या मुद्यावर चीनविरोधात कोरडे ओढले होते.

येत्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघटनेने झिंजिआंगमधील उघुरवंशिय व इतर अल्पसंख्य समुदायावर होणार्‍या अत्याचारांच्या मुद्यावर बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी या देशांनी पुढाकार घेतला असून, ऑस्ट्रेलिया व कॅनडानेही समर्थन दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना, सदस्य देश व मानवाधिकार संघटना झिंजिआंगमधील मानवाधिकारांसाठी कशा प्रकारे प्रयत्न करु शकतील, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. या व्हर्च्युअल बैठकीला संयुक्त राष्ट्रसंघटनेतील सदस्य देशांच्या दूतांसह मानवाधिकार संघटनांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघटनेसारख्या व्यापक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उघुरवंशियांचा मुद्दा उपस्थित होत असल्याने चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. याच अस्वस्थतेतून चीनने इतर देशांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा इशारा दिल्याचे दिसत आहे. ‘झिंजिआंगबाबतची बैठक राजकीय हेतूंनी प्रेरित असलेला कार्यक्रम आहे. इतर देशांच्या प्रतिनिधींनी त्याला उपस्थित राहू नये. बैठकीचे आयोजन करणारे देश मानवाधिकारांचा वापर राजकीय शस्त्रासारखा करून चीनच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनला चिथावणी देण्याच्या उद्देशाने हे देश पछाडले आहेत’, असा आरोप चीनने केला आहे.

गेल्या काही वर्षात जगातील अधिकाधिक देश चीनकडून झिंजिआंगमध्ये सुरू असलेल्या कारवायांविरोधात उघड आवाज उठवित आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून उघुरांवर चाललेले अत्याचार म्हणजे वंशसंहार असल्याचा ठपका ठेवला आहे. इतर देशांमध्येही या स्वरुपाचे प्रयत्न सुरू असून चीनची राजवट चांगलीच अडचणीत आली आहे. त्यामुळे आपली बाजू सावरण्यासाठी चीनकडून इतर देशांवर दडपण आणण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे नव्या घटनेवरून दिसून येत आहे.

leave a reply