विविध राज्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेन सोडणार

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंतरराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या नागरिकांसाठी प्रत्येक राज्यातून विशेष ट्रेन सेवा सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली. या विशेष ट्रेन ने १२०० कामगारांना झारखंडला पाठवण्यात आले.

लॉकडाऊनमुळे हजारो नागरिक अनेक राज्यांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यात अडकून पडले आहेत. यासह बस, रेल्वे आणि विमानसेवा बंद करण्यात आल्याने अन्यत्र शिकत असलेले विद्यार्थी, पर्यटक देखील मूळ राज्यात परतू शकलेले नाहीत. त्यामुळे संबंधित राज्यांकडून स्थलांतरित मजुरांसाठी गावी परत जाण्यासाठी सुविधा पुरवण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे या मजुरांसह अडकलेल्या विद्यार्थी आणि पर्यटकांनाही त्यांच्या गावी जाण्यास परवानगी द्यावी आणि त्यांच्या प्रवासाची सोय करावी, अशी मागणी राज्यांनी केंद्राकडे केली होती.

या मागणीचा विचार करून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या वाहतुकीसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या अडकलेल्या लोकांच्या वाहतुकीकरिता रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच तिकिटांच्या विक्रीसाठी आणि रेल्वे स्थानकांवर, रेल्वे फलाटांवर आणि गाड्यांमध्ये सोशल डिस्टंगसिंग संदर्भातील नियम तसेच इतर सुरक्षा उपाययोजनांबाबत रेल्वे मंत्रालय सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकारच जाहीर करणार आहे. प्रवासापूर्वी प्रत्येक मजुराची चाचणी करण्यात येणार असून कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची खात्री करूनच त्यांना प्रवासाची मुभा दिली जाईल.

२५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. राज्यांच्या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रवासाची मुभा दिली होती. त्यानंतर आता विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे सुमारे ४० दिवस अडकून पडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेलंगणा सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी विशेष रेल्वे सोडली. १२०० कामगारांना घेऊन हैदराबादच्या लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी सकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी ही रेल्वे रवाना करण्यात आली. सोशल डिस्टंगसिंग विचार करता ७२ आसन क्षमता असलेल्या प्रत्येक डब्यात ५४ जणांना पाठवण्यात आले.

मध्य प्रदेश सरकारने देखील वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या नागरिकांना पुन्हा परत आणण्यासाठी पावले उचलली आहेत. अन्य राज्यांत अडकलेल्या २० हजारांहून अधिक कामगारांना मध्य प्रदेशमध्ये आणण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आय सी पी केशारी यांनी ही माहिती दिली. राजस्थानमधील जैसलमेर, नागौर, जोधपूर आणि जयपूर येथे अडकलेल्या २० हजार मजुरांना मध्य प्रदेश मध्ये आणण्यात आले. या सर्वांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना त्याच्या जिल्ह्यात पाठवण्यात येईल. यासह वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना माघारी आणण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश आणि पंजाब सरकारने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाडी सोडण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने बसेसची व्यवस्था देखील केली आहे. एकट्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये अंदाजे १० लाख मजूर, विद्यार्थी येण्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

leave a reply