भारत व व्हिएतनाममधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट होईल

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – चीन भारताच्या शेजारी देशांना हाताशी धरून नव्या कुरापती काढण्याचे प्रयत्न करीत असतानाच भारताने भौगोलिकदृष्ट्या चीनच्या नजिक असणाऱ्या देशांशी संबंध बळकट करण्यास सुरुवात केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, चीनबरोबर तणावपूर्ण संबंध असणाऱ्या व्हिएतनामला ‘नॅशनल डे’ निमित्त शुभेच्छा देताना धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याची ग्वाही दिली आहे. गेल्याच आठवड्यात ‘इंडिया-व्हिएतनाम जॉइंट कमिशन’ची बैठक पार पडली होती. या बैठकीत, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, व्हिएतनामला ‘इंडो पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह’ मध्ये सामील होण्याचे निमंत्रणही दिले होते.

धोरणात्मक भागीदारी

चीनकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे सध्या भारत-चीन नियंत्रणरेषेवर प्रचंड तणाव आहे. भारताने लष्करी पातळीवर चीनला खणखणीत प्रत्युत्तर दिले असून, आर्थिक तसेच राजनैतिक पातळीवरही चीन विरोधात आक्रमक आघाडी उघडली आहे. भारत सातत्याने आपल्या मित्र देशांच्या संपर्कात असून चीनवरील दडपण अधिक वाढविण्यासाठी आग्नेय आशियाई देशांशीही सहकार्य बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्हिएतनामला दिलेला शुभेच्छा व सहकार्याबाबत केलेले वक्तव्य त्याचाच भाग ठरतो.

व्हिएतनाम ७५वा राष्ट्रीय दिन साजरा करीत असून त्यानिमित्ताने मी व्हिएतनाम सरकार, व्हिएतनामी जनता आणि माझे सहकारी व्हिएतनामचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री फाम बिन्ह मिन्ह यांना मनापासून शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात भारत व व्हिएतनाममधील धोरणात्मक भागीदारी अधिकाधिक बळकट होईल, याची मला पूर्ण खात्री आहे’, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत भारताने व्हिएतनामबरोबर सागरी क्षेत्रातील इंधन उत्खननाबाबत करार केले असून संरक्षण सहकार्य देण्याचेही मान्य केले आहे. त्यासाठी भारताकडून व्हिएतनामला जवळपास ६० कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्यही देण्यात आले आहे.

धोरणात्मक भागीदारी

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या सत्ताधारी राजवटीने आपल्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. साऊथ चायना सी क्षेत्रात तैवान व व्हिएतनाम सारख्या देशांच्या हद्दीत सुरू असलेल्या कारवाया आणि भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रयत्न त्याचाच भाग आहे. चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका व भारतासह प्रमुख देश वेगाने पावले उचलत आहेत. त्यात चीनच्या नजीक असणाऱ्या आग्नेय आशियाई देशांनाही सहभागी करण्यात येत असून, भारताने व्हिएतनाम बरोबर धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी घेतलेला पुढाकार त्याचाच भाग आहे. भारत व व्हिएतनाममधील या वाढत्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर, हे दोन्ही देश येणाऱ्या काळात आशिया खंडातील ‘आयर्न ब्रदर्स’ ठरतील असा दावा प्रसारमाध्यमांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

leave a reply