दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांकडून कठोर कायद्याचे संकेत

कठोर कायद्याचे संकेतऑकलंड – शुक्रवारी ऑकलंडमध्ये झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात आलेल्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी नव्या कठोर कायद्याचे संकेत दिले आहेत. सदर हल्लेखोर 2016 सालापासून ‘वॉचलिस्ट’वर असतानाही हल्ला झाल्याने न्यूझीलंडची सुरक्षायंत्रणा व कायद्यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. दरम्यान, हल्लेखोराचे नाव अहमद अथील मोहमद शमसुद्दिन असून तो मूळचा श्रीलंकेतील इस्लामधर्मिय असल्याचे सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी दुपारी ऑकलंडमधील ‘काऊंटडाऊन’ सुपरमार्केटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 32 वर्षीय अहमद अथीलने सातजणांना सुऱ्याने भोसकले होते. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. हल्लेखोर वॉचलिस्टमध्ये असल्याने मागावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ सुपरमार्केटमध्ये कारवाई करून हल्लेखोराला ठार केले. मात्र वॉचलिस्टवर असताना हल्ला झाल्याने न्यूझीलंडच्या सरकारसह सुरक्षायंत्रणांवर जोरदार टीका सुरू झाली होती.

कठोर कायद्याचे संकेतन्यूझीलंडच्या पंतप्रधान आर्डन यांनी संशयित दहशतवादी वॉचलिस्टवर असतानाही हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल हतबलता व्यक्त केली होती. मात्र आता टीकेचा सूर तीव्र झाल्यानंतर दहशतवादविरोधी कायदा अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या महिन्याभरात न्यूझीलंडमध्ये नवा कायदा तयार झालेला असेल, असे पंतप्रधान आर्डन म्हणाल्या. नव्या कायद्यात हल्ल्याची योजना आखणे व तसे संकेत देणे या गोष्टी गुन्हेगारी स्वरुपाच्या ठरवून शिक्षेची तरतूद असेल, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, 32 वर्षीय अहमद अथील हल्ला करण्याची भीती असतानाही त्याला तुरुंगातून सोडण्यात आल होते, असे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भातील खटल्यात न्यूझीलंडच्या न्यायाधीशांनी पोलिसांकडून केस हाताळण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी गेले जवळपास दोन महिने 30 पोलिसांचे पथक अहमद अथीलच्या मागावर होते, अशी माहितीही उघड झाली आहे.

2017 साली अहमद अथीलने सिरियात जाऊन ‘आयएस’मध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्याला न्यूझीलंडमधील विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर घराची झडती घेतली असता शस्त्रास्त्रे व काही वादग्रस्त फोटोग्राफ्स सापडले होते. एक वर्षाच्या तुरुंगवासानंतर त्याला सोडण्यात आले होते. त्यानंतर 2018 साली पुन्हा तीन वर्षाची शिक्षा झाली होती. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी ‘आयएस’ समर्थक अहमद अथीलला ताब्यात घेण्यात आले होते.

leave a reply