सरकारस्थापनेवरून तालिबानमध्ये तीव्र मतभेद

- अफगाणी सरकारमधील हक्कानी नेटवर्कच्या वर्चस्वासठी पाकिस्तानची धडपड

हक्कानीकाबुल – सत्तेतील वाटा व सरकारवरील नियंत्रण यावरून तालिबानमध्ये खडाजंगी सुरू आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारचे नेतृत्व मुल्ला बरादरकडे न देता हक्कानी नेटवर्ककडे सोपवावे, यासाठी पाकिस्तान धडपडत आहे. यासाठीच पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद शनिवारी अफगाणिस्तानात दाखल झाले होते. पाकिस्तानच्या या मागणीमुळे संतापलेल्या मुल्ला बरादर यांनी पंजशीरमध्ये संघर्षासाठी गेलेल्या आपल्या टोळ्यांना माघारी बोलावले, असा दावा माजी अफगाण संसद सदस्या मरियम सोलेमानखिल यांनी केला.

अफगाणिस्तानातील सरकारस्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून शुक्रवारी याची घोषणा करण्यात येईल, असे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने म्हटले होते. या सरकारमध्ये तालिबानचा प्रमुख हैबतुल्ला अखुंदझदा याच्याकडे सर्वोच्च धार्मिक नेतेपद तर दुसर्‍या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर याच्याकडे राष्ट्राध्यक्षपद असेल, अशी माहिती तालिबानच्या सूत्रांनी दिली होती. तर तालिबानचा नेता मुल्ला याकूब याच्याकडे संरक्षण मंत्रालय आणि हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानीकडे अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सोपविल्याचे बोलले जात होते.

पण हे सत्तावाटप मान्य नसल्याचे सांगून हक्कानी गटाने बरादर गटाबरोबर वाद घातला. यामुळे सरकार स्थापनेची घोषणा शनिवारपर्यंत पुढे ढकलावी लागली होती. अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद शनिवारी काबुलमध्ये दाखल झाले. तालिबानच्या आमंत्रणावर हमीद अफगाणिस्तानात गेल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकारांनी केला होता. पण ‘आयएसआय’चे प्रमुख तालिबानच्या आमंत्रणावर नाही तर हक्कानी गटाची दावेदारी भक्कम करण्यासाठी काबुलमध्ये आल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्या मरियम सोलेमानखिल यांनी केला.

अफगाणिस्तानातील सरकारचे नेतृत्व मुल्ला बरादरकडे न देता हक्कानीकडे जाईल, याची खातरजमा करण्यासाठीच आयएसआय प्रमुख काबुलमध्ये आले होते. यावरुन तालिबानच्या गटांमध्ये जोरदार भांडणे झाली असून बरादरने पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सबरोबर लढण्यासाठी गेलेल्या आपल्या टोळीला माघारी बोलावले आहे’, असा दावा मरियम यांनी केला आहे.

मुल्ला बरादरने आपल्या दहशतवाद्यांना माघारी घेतल्यामुळे आता केवळ हक्कानी गटाचे दहशतवादी पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सबरोबर लढत आहेत. हक्कानी गटाला साथ देण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराचे जवान तालिबानचे जिहादी म्हणून लढत असल्याचे नव्याने समोर आले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या जवानाला अटक करून त्याच्या जबानीचा व्हिडिओ नॉर्दन अलायन्सने प्रसिद्ध केला आहे. तसेच या संघर्षात तालिबानचे शेकडो दहशतवादी ठार केल्याचा दावा नॉर्दन अलायन्स करीत आहे. पण याची पुष्टी होऊ शकलेली नाही.

अफगाणिस्तानातील काही पत्रकार देखील दबक्या आवाजात मरियम सोलेमानखिल यांच्या आरोपांना दुजोरा देत आहेत. ‘तीन आठवड्यांपूर्वी आपल्या गटाने राजधानी काबुल काबिज केली, त्यामुळे सरकारवर आपलाच सर्वाधिक अधिकार असल्याचे हक्कानी गटाचे म्हणणे आहे’, अशी माहिती संबंधित पत्रकाराने दिली. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील सत्तेत हजारा, ताजिक, उझबेक, हिंदू व शीख या अल्पसंख्यांकांना स्थान देणार नाही, असे हक्कानी गटाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुल्ला बरादर यांच्या गटात तीव्र नाराजी असल्याचा दावा केला जातो. तसेच अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी केलेल्या मागणीनुसार तालिबानमधील काही गट अल कायदाबरोबरील आपले सहकार्य तोडायला तयार नाहीत. हा देखील वादाचा विषय बनला आहे.

तालिबान लवकरच सरकार स्थापन करील, असे चित्र पाकिस्तानचे लष्कर आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या माध्यमांमार्फत उभे करीत आहे. पण गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे तालिबानमधील मतभेदांची दरी अधिकच रुंदावत चालली आहे. हक्कानी गटावर पाकिस्तानचा प्रभाव असून त्यांचे तळ पाकिस्तानातच आहे. मात्र तालिबानमधील काही गटांचा हक्कानी नेटवर्क आणि पाकिस्तानवरही विश्‍वास नाही.

दरम्यान, तालिबान आणि हक्कानी नेटवर्क, या दोन्ही वेगळ्या संघटना असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे हक्कानी गटाला अमेरिका व मित्रदेशांकडून मान्यता मिळणे अवघड असल्याचे समोर येत आहे. पण हा तालिबानमधला सर्वात मोठा गट असून यामागे पाकिस्तानचे पाठबळ आहे. म्हणूनच हक्कानी गट मुल्ला बरादर सारख्या तालिबानच्या मोठ्या नेत्याला आव्हान देत असल्याचे दिसते.

leave a reply