इराक, सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर रॉकेट हल्ले

बगदाद – इराकमध्ये तळ ठोकणार्‍या अमेरिकी लष्कराविरोधात ‘ओपन वॉर’ छेडले जाईल, अशी धमकी इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाने दिली. या धमकीला काही तास उलटत नाही तोच इराकच्या इरबिल आणि एन अल-असाद तसेच सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये तीन जवान जखमी झाल्याचे अमेरिकी लष्कराने स्पष्ट केले. पण आपल्या या हल्ल्यात अमेरिकी जवानांचा बळी गेल्याचा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानंतर अमेरिकी लढाऊ विमानांनी इराक आणि सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर हवाई हल्ले चढविले होते. या कारवाईत इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे जबर नुकसान झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. इराकमधील इराणसंलग्न ‘कतैब सईद अलसुहादा’ या संघटनेचा प्रमुख अबू अला अल-वली याने अमेरिकेच्या या हल्ल्याचा सूड घेण्याची धमकी दिली.

‘इराकी बांधवांची हत्या घडविणार्‍या अमेरिकेचा सूड घेण्यासाठी तीव्र हल्ले चढविले जातील. अगदी इराकच्या सीमेसह हवेत, पाण्यात किंवा या क्षेत्रात कुठेही अमेरिकेला लक्ष्य केले जाईल. हे एक खुले युद्ध असेल’, असे अल-वली याने धमकावले होते. यानंतर पुढच्या काही तासात इराक तसेच सिरियातील अमेरिकेच्या ठिकाणांवरील हल्ले वाढले आहेत. सलग तीन दिवस इराकमधील अमेरिकेच्या लष्करी, हवाई तळांबरोबर दूतावास आणि गस्त घालणार्‍या जवानांना लक्ष्य केले जात असल्याच्या बातम्या आहेत.

मंगळवारी संध्याकाळी उत्तर इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट्स तसेच ड्रोन हल्ले झाले. या ठिकाणी अमेरिकी लष्कराचा तळ आहे. यानंतर इरबिल शहरातील अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याशिवाय दहशतवाद्यांनी इरबिलमधील सलाह अल-दीन रिसॉर्टजवळील इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे सेफहाऊस लक्ष्य केल्याची बातमी आली होती. पण या हल्ल्याची पुष्टी होऊ शकलेली नाही.

बुधवारी सकाळी अल-असाद हवाईतळावर 14 रॉकेट हल्ले झाले. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या तळावर रॉकेट्सबरोबर क्षेपणास्त्रांचे हल्ले झाल्याचे म्हटले आहे. या पूर्ण हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याची माहिती इराकमधील पाश्‍चिमात्य लष्कराचे प्रवक्ते कर्नल वेन मॅरोटो यांनी दिली. या हल्ल्यात तळाचे झालेल्या नुकसानाची पाहणी सुरू असल्याचे कर्नल मॅरोटो म्हणाले. पण इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने, आपल्या हल्ल्यात अमेरिकी जवानांचा मोठ्या संख्येने बळी गेल्याचा दावा केला.

सिरियाच्या देर अल-झोर भागातील अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या अल ओमर इंधनक्षेत्रावर ड्रोन हल्ला झाला. अमेरिकेशी संलग्न असलेल्या ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ या कुर्दांच्या संघटनेने ही माहिती उघड केली. गेल्या चार दिवसात सिरियातील अमेरिकेच्या ठिकाणावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो.

दरम्यान, सौदी अरेबियाचे उपसंरक्षणमंत्री ‘खालिद बिन सलमान’ हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. उपसंरक्षणमंत्री खालिद यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन तसेच पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांची भेट घेतील. इराणचा अणुकार्यक्रम आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे वाढते हल्ले यावर अमेरिका व सौदीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचा दावा केला जातो.

leave a reply