अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून उडत्या तबकड्यांमधून मिळालेल्या अवशेषांचा अभ्यास सुरू होता

- संशोधक अँथनी ब्रॅगालिया

अवशेषांचा अभ्यासवॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून पूर्वीपासून पृथ्वीवर आलेल्या उडत्या तबकड्यांचा व त्यातून मिळालेल्या अवशेषांचा अभ्यास सुरू होता, अशी खळबळजनक माहिती संशोधक अँथनी ब्रॅगालिया यांनी उघड केली. ब्रॅगालिया यांनी मिळविलेल्या माहितीत, ‘मेमरी मेटल’, ‘मेटामटेरिअल्स’, ‘अदृश्यता’, ‘प्रकाशाचा वेग कमी करण्याची शक्ती’ व ‘इलेक्टोमॅग्नेटिक एनर्जी’ला संकुचित करण्याची क्षमता यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. २०१७ साली अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पहिल्यांदाच उडत्या तबकड्यांसंदर्भात संशोधन सुरू असल्याची अधिकृत कबुली दिली होती.

अमेरिकेतील ‘फ्रीडम ऑफ इन्फोर्मेशन अ‍ॅक्ट’च्या आधारे संशोधक अँथनी ब्रॅगालिया यांनी, तीन वर्षांपूर्वी ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’कडे (डीआयए) उडत्या तबकड्यांसंदर्भात माहिती मागितली होती. एजन्सीकडून त्यांना जवळपास दीडशे पानांची माहिती पाठविण्यात आली असून त्यातून अनेक आश्‍चर्यजनक गोष्टी बाहेर आल्या आहेत. उघड झालेल्या माहितीतील बहुतांश गोष्टी १९४७ साली अमेरिकेच्या न्यू मेक्सिको प्रांतात नोंद झालेल्या उडत्या तबकडीच्या दुर्घटनेशी संबंधित असाव्यात, असा दावा ब्रॅगालिया यांनी केला. ही घटना ‘१९४७ रोझवेल क्रॅश’ म्हणून ओळखण्यात येते.

जुलै १९४७ साली न्यू मेक्सिको प्रांतात एक उडती तबकडी कोसळल्याच्या घटनेची नोंद झाली होती. अमेरिकेच्या हवाईदलाने फक्त एक ‘वेदर बलून’ कोसळल्याचे सांगून ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांचा अभ्यास करणार्‍या संशोधकांनी या घटनेसंदर्भात वेगवेगळ्या ‘कॉन्स्पिरसी थिअरीज्’ मांडल्या होत्या. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यासंदर्भाती संपूर्ण माहिती खुली केली नसल्याने आजही ही घटना एक गूढ म्हणून ओळखली जाते. या पार्श्‍वभूमीवर, ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ने दिलेल्या माहितीवरून ब्रॅगालिया यांनी केलेले दावे लक्ष वेधून घेणारे ठरतात.

अवशेषांचा अभ्यास‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ने दिलेल्या माहितीपैकी ‘अ‍ॅडव्हान्स्ट टेक्नॉलॉजी रिपोर्टस्’ हा भाग ठरला आहे. यात ‘निटायनॉल’ या ‘मेटल अलॉय’चा (दोन धातुंपासून बनविलेले संयुग) उल्लेख आहे. ‘निकेल’ व ‘टायटॅनियम’ या दोन धातूंपासून तयार होणार्‍या या संयुगाचा शोध १९५९ साली लागल्याचे मानले जाते. ‘शेप मेमरी’ व ‘सुपरइलॅस्टिसिटी’ (अतिलवचिकता) हे या संयुगाचे वैशिष्ट्य आहे. ‘१९४७ रोझवेल क्रॅश’च्या अवशेषांबाबत करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये एका गोष्टीचा उल्लेख ‘मेमरी मेटल’ असा केला गेला होता. हा उल्लेख व ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ने दिलेल्या माहितीतील ‘निटायनॉल’चा संदर्भ यात साम्य असल्याकडे ब्रॅगालिया यांनी लक्ष वेधले आहे.

याव्यतिरिक्त ‘मेटामटेरिअल’ व ‘अ‍ॅमॉर्फस मेटल’ याबद्दलही ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ने माहिती दिली आहे. यातील ‘मेटामटेरिअल’चा वापर प्रकाशाचा वेग कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी करता येऊ शकतो, असे माहितीत नमूद करण्यात आले आहे. ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’च्या अहवालात, अदृश्यतेसंदर्भातील तंत्रज्ञानाचा उल्लेख असून ‘ऑप्टिकल आयसोलेशन’ व ‘मेटामिरर टेक्नॉलॉजी’ यासारख्या संज्ञाचा वापर करण्यात आला आहे. ‘मेटामटेरिअल’मध्ये ‘इलेक्टोमॅग्नेटिक एनर्जी’ला संकुचित करण्याची क्षमता असल्याचेही संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.

अमेरिकेचा संरक्षण विभाग व अंतराळ क्षेत्रातील कंपनी ‘बिगेलो एरोस्पेस’ यांनी उडत्या तबकड्यांमधून मिळालेल्या अवशेषांचा अभ्यास तसेच संशोधन केल्याची माहिती ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ने दिली आहे. ‘बिगेलो एरोस्पेस’ या कंपनीने गेल्याच वर्षी आपल्याकडील सर्व कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले असून सध्या कंपनी बंद पडली आहे. उडत्या तबकड्यांचे जे अवशेष कंपनीला अभ्यासासाठी दिले होते, त्याचा ठावठिकाणा सांगण्यास कंपनीने नकार दिल्याची माहिती संशोधक अँथनी ब्रॅगालिया यांनी दिली.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एका विशेष ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली होती. ‘द अनआयडेंटिफाईड एरियल फेनॉमेना टास्क फॉर्स’(यूएपिटीएफ) असे या गटाचे नाव असून, त्यात संरक्षण विभागाबरोबरच ‘ऑफिस ऑफ नेव्हल इंटेलिजन्स’चा सहभाग असणार आहे. अज्ञात उडत्या तबकड्यांपासून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती, संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली होती. त्यापूर्वी २०१९ साली, अमेरिकेच्या नौदलाने पहिल्यांदाच उडत्या तबकड्यांचे (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) प्रसिद्ध झालेले व्हिडीओ खरे असल्याची कबुली दिली होती.

leave a reply