‘ग्लोबल इंटरनेट’शी संपर्क तोडून रशियाकडून पुन्हा एकदा स्वतंत्र इंटरनेटची यशस्वी चाचणी

यशस्वी चाचणीमॉस्को – रशियाने आपल्या देशातील इंटरनेटचा जागतिक इंटरनेटशी असलेला संपर्क तोडून स्वतंत्र रशियन इंटरनेटची यशस्वी चाचणी घेतल्याचे वृत्त ‘आरबीसी डेली’ या रशियन दैनिकाने दिले आहे. 15 जून ते 15 जुलै या कालावधीत ही चाचणी घेण्यात आली असून याचा वापर रशिया सायबरयुद्धात करु शकतो, असा दावा रशियन दैनिकाने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी स्वतंत्र रशियन इंटरनेट उभारण्याची घोषणा केली होती.

‘रशियाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या तसेच इंटरनेट सेवा पुरविणार्‍या यंत्रणा चाचणी सरावात सहभागी झाल्या होत्या. परदेशातून होऊ शकणारे हल्ले, अडथळे व इतर धोक्यांना तोंड देताना स्वतंत्र रशियन इंटरनेट कसे कार्यरत राहू शकते याची शक्यता पडताळून पाहणे हा सरावाचा उद्देश होता. याचा अधिकृत निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. मात्र प्राथमिक निकषांनुसार सराव यशस्वी झाला आहे. जागतिक इंटरनेटचा रशियन हिस्सा तोडून टाकण्याची यशस्वी चाचणी सरावात घेण्यात आली’, अशी माहिती ‘आरबीसी डेली’ या रशियन दैनिकाच्या वृत्तात देण्यात आली आहे.

रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनीही सरावाच्या वृत्ताला दुजोरा दिला. सराव योग्य वेळी आयोजित करण्यात आला असून, रशिया कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यास तयार असल्याचे पेस्कोव्ह यांनी म्हटलेे आहे. रशियन यंत्रणा ‘रॉसकॉम्झॉर’ने, सदर सराव व चाचण्या रशियन इंटरनेटच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व दर्जा तपासणे यासाठी घेण्यात आला होता, असा दावा केला आहे.

यशस्वी चाचणीरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुढाकार घेऊन 2019 साली ‘सॉव्हरिन रशियन इंटरनेट लॉ’ला मंजुरी दिली होती. अमेरिका व युरोपकडून इंटरनेट तसेच सोशल मीडियाचा रशियन राजवटीविरोधात होणारा वापर लक्षात घेऊन ही महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली होती. या कायद्यानुसार, रशिया 2022 सालापर्यंत स्वतंत्र इंटरनेट सुरू करेल, असे सांगण्यात आले होते. 2020 साली तसेच या वर्षाच्या सुरुवातीला रशियाने काही प्राथमिक चाचण्याही घेतल्या होत्या. मात्र 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये झालेला सराव स्वतंत्र रशियन इंटरनेटची सर्वात मोठी व व्यापक चाचणी असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही वर्षात अमेरिकेसह युरोपिय देशांकडून सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर सातत्याने रशियाला लक्ष्य करण्यात आले आहे. सायबरहल्ले चढविणार्‍या हॅकर्सना रशियाचे समर्थन तसेच आश्रय असल्याचे आरोप पाश्‍चात्य देशांनी केले आहेत. अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांनी प्रत्युत्तरादाखल रशियावर सायबरहल्ले चढविण्याचाही इशारा दिला होता. या देशांनी अशा प्रकारची कारवाई केल्याचेही दावे करण्यात येतात.

या पार्श्‍वभूमीवर रशियाने स्वतंत्र इंटरनेटच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे नव्या सरावावरून दिसून येते. भविष्यात रशियावर सायबरहल्ले झाले तरी रशिया जागतिक इंटरनेट यंत्रणेपासून स्वतःला वेगळे करून पुढे व्यवहार सुरु ठेवू शकतो, याची झलक सरावातून देण्यात आल्याचे मानले जाते.

leave a reply