पाच हजार किलोमीटरवरील लक्ष्य भेदणार्‍या

- अग्नी-५ची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली – सुमारे पाच हजार किलोमीटरवर असलेले लक्ष्य अचूकतेने भेदण्याची क्षमता असलेले अणुस्फोटके वाहून नेऊ शकणार्‍या, आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-५ची चाचणी यशस्वी ठरली. अशी क्षमता असलेल्या काही मोजक्या देशांच्या श्रेणीत आता भारताचाही समावेश झाला आहे. चीनचा सारा भूभाग अग्नी-५च्या टप्प्यात येतो. त्याचवेळी सांगितले जाते, तशी अग्नी-५ ची क्षमता केवळ पाच हजार किलोमीटरपुरती मर्यादित नाही, तर हे क्षेपणास्त्र त्यापलिकडील अंतरावरही मारा करू शकेल, असा दावा काही सामरिक विश्‍लेषक करीत आहेत.

पाच हजार किलोमीटरवरील लक्ष्य भेदणार्‍या - अग्नी-५ची यशस्वी चाचणीबुधवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-५ दागण्यात आले. डीआरडीओने विकसित केलेले हे पूर्णपणे स्वदेशी क्षेपणास्त्र मोबाईल लॉंचरद्वारे प्रक्षेपित करण्यात आले असून जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राने सारे निकष पूर्ण केले. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता व अचूकतेच्या आघाडीवरील निषकही या क्षेपणास्त्रे पूर्ण केले, अशी माहिती दिली जाते. ५० टन इतक्या वजनाचे अग्नी-५ सुमारे एक टनाहून अधिक अणुस्फोटके वाहून नेऊ शकते. त्यामुळे ही चाचणी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरते.

अग्नी-५ची ही चाचणी भारताने स्वीकारलेल्या अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही, या धोरणाशी सुसंगत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारताने स्वीकारलेल्या प्रथम वापर न करण्याच्या या धोरणामुळेच, अणुहल्ल्यांपासून आपली सुरक्षा करण्यासाठी भारताला ‘क्रेडिबल मिनिमम डिटरंन्स’ अर्थात आण्विक हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता विकसित करणे भाग होते. सदर क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे ही बाब अधिकच सुनिश्‍चित झाल्याचे समोर येत आहे. भारत अग्नी-५ची चाचणी करणार असल्याच्या बातम्या काही काळापूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. काही कारणांमुळे याची तारीख पुढे ढकलावी लागली होती. भारताच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर चीनने जोरदार आक्षेप नोंदविला होता. ही चाचणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमाविरोधात असल्याचे चीनने बजावले होते.

चीन करीत असलेल्या या कांगाव्याकडे दुर्लक्ष करून भारताने ही चाचणी केली आहे. काही दिवसांपूर्वी चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी करून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, भारताने अग्नी-५ची चाचणी घेऊन आपली क्षमता सार्‍या जगाला दाखवून दिली. भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम चीनच्या खूपच मागे आहे, असे दावे याआधी चीनने ठोकले होते. मात्र अग्नी-५च्या चाचणीची बातमीही चीनला अस्वस्थ करणारी ठरली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, अग्नी-५च्या यशस्वी चाचणीचे पडसाद चीनकडून उमटू शकतात.

leave a reply