इराणच्या ड्रोन फॅक्टरीमध्ये संशयास्पद स्फोट

- ब्रिटनच्या वर्तमानपत्राचा दावा

लंडन – इराणच्या इस्फाहन प्रांतातील केमिकल फॅक्टरीत रविवारी स्फोट झाला. या स्फोटात 15 जण जखमी झाल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संलग्न वृत्तसंस्थेने म्हटले आहे. पण हा स्फोट ड्रोन्सची निर्मिती करणार्‍या फॅक्टरीत झाल्याचा दावा ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ या वर्तमानपत्राने केला आहे. गेल्याच आठवड्यात इस्रायलमध्ये हल्ला चढविण्यासाठी रवाना केलेल्या ड्रोनची निर्मिती याच कंपनीत झाल्याची दाट शक्यता सदर वर्तमानपत्राने वर्तविली. त्यामुळे या फॅक्टरीतील संशयास्पद स्फोटाचे महत्त्व वाढले आहे.

इराणच्या ड्रोन फॅक्टरीमध्ये संशयास्पद स्फोट - ब्रिटनच्या वर्तमानपत्राचा दावामध्य इराणच्या इस्फाहन प्रांतातील शाहिनशाहर या भागात मोठा स्फोट झाला. रविवारी पहाटे चारच्या सुमारास येथील सेपाहन नारगोस्टार केमिकल इंडस्ट्रिज्च्या परिसरात कानठळ्या बसविणारा आवाज झाला. पुढच्या काही तासात इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी या परिसराचा ताबा घेऊन आग नियंत्रणात आणली. या स्फोटात जीवितहानी झालेली नाही, पण 15 जण जखमी झाले आहेत. यातील नऊ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असे इराणच्या लष्कराशी संलग्न वृत्तसंस्थेने जाहीर केले.

सेपाहन नारगोस्टार केमिकल इंडस्ट्रिज् ही कंपनी औद्योगिक-व्यावसायिक स्तरावरील स्फोटकांची निर्मिती करते. तसेच या ठिकाणी फटाके आणि तत्सम उत्पादनांची निर्मिती केली जाते, असे इस्फाहान आपत्ती निवारण दलाचे प्रमुख मन्सूर शिशेफोरोष यांनी सांगितले. पण फटाक्यांची निर्मिती करणार्‍या नारगोस्टार केमिकल इंडस्ट्रिज्चा परिसर इराणच्या सुरक्षा काऊन्सिलच्या अखत्यारित येतो, यावर काही माध्यमे आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.

इराणच्या ड्रोन फॅक्टरीमध्ये संशयास्पद स्फोट - ब्रिटनच्या वर्तमानपत्राचा दावाब्रिटीश वर्तमानपत्राने याबाबत वेगळीच माहिती दिली आहे. सदर परिसरातील ड्रोनची निर्मिती करणार्‍या कंपनीत हा स्फोट झाला. इराणचे लष्कर तसेच इराणशी संलग्न असलेल्या गटांसाठी याठिकाणी लष्करी ड्रोन्स तयार केले जातात, असे या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. ‘इराण एअरक्राफ्ट इंडस्ट्रिज् कंपनी’ किंवा ‘एचईएसए’ ही कंपनी या ड्रोन्सची निर्मिती करते. याच कंपनीच्या फॅक्टरीत रविवारी पहाटे स्फोटानंतर आग भडकली, असे ब्रिटीश वर्तमानपत्र सांगत आहे.

तीन दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी माध्यमांसमोर दिलेल्या माहितीची आठवण ब्रिटनच्या या वर्तमानपत्राने करून दिली. गेल्या आठवड्यात इस्रायलच्या लष्कराने सीमेपलिकडून घुसखोरी करणारे ड्रोन पाडले होते. स्फोटकांनी भरलेले हे ड्रोन इराणचे असून गाझातील हमासच्या हल्ल्यांना सहाय्य म्हणून इराणने इस्रायलवर ड्रोन हल्ल्याचा कट आखला होता. सिरिया किंवा इराकमधून हे ड्रोन प्रक्षेपित केले असावे, अशी शक्यता पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी वर्तविली होती. तसेच इराण हा दहशतवादाचा प्रायोजक असल्याचा आरोप नेत्यान्याहू यांनी केला होता.इराणच्या ड्रोन फॅक्टरीमध्ये संशयास्पद स्फोट - ब्रिटनच्या वर्तमानपत्राचा दावा

इस्रायली पंतप्रधानांनी माध्यमांसमोर प्रदर्शित केलेल्या इराणी बनावटीच्या ड्रोन्सची निर्मिती करणार्‍या फॅक्टरीवरच रविवारी हा स्फोट झाला, असा दावा ब्रिटीश वर्तमानपत्राने केला. इराणने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा सदर वृत्त फेटाळलेलेही नाही. पण या घटनेमुळे इराणमधील सरकारी तसेच लष्करी आस्थापनांमधील संशयास्पद स्फोटांची मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात इराणचे लष्कर आणि अणुकार्यक्रमाशी संबंधित प्रकल्प, कंपन्या व कारखान्यांमध्ये संशयास्पद स्फोट होऊन आगी भडकल्या होत्या. एकट्या नातांझ अणुप्रकल्पात तीन वेळा संशयास्पद स्फोट झाले आहेत. यापैकी 12 एप्रिल रोजीचा स्फोट सर्वात भीषण होता, असा दावा केला जातो. या स्फोटासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप इराणच्या नेत्यांनी केला होता.

leave a reply