इराणच्या वीजप्रकल्प आणि इंधन पाईपलाईनमध्ये संशयास्पद स्फोट

Iran-Blastतेहरान – इराणमधील संशयास्पद स्फोट आणि आगींची मालिका सुरू असून गेल्या दोन दिवसात तीन महत्त्वाच्या ठिकाणी आगी भडकल्याचे समोर आले आहे. यापैकी नातांझ अणुप्रकल्पाला वीजपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात रविवारी संशयास्पद स्फोट झाला. या महिन्याच्या सुरुवातीला नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या संशयास्पद आगीने इराणचे मोठे नुकसान झाले होते. अणुप्रकल्पातील या आगीसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर, नातांझ प्रकल्‍पाशी संबंधित या आणखी एका आगीने सदर घडामोडींचे गांभीर्य वाढले आहे.

रविवारी इराणमधील दोन ठिकाणी संशयास्पद स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये इस्फाहन प्रांतातील इस्लामाबाद वीज प्रकल्पाचा समावेश आहे. सकाळी या वीजप्रकल्पात अचानक आग लागून मोठे स्फोट झाले. या आगीत सदर प्रकल्पातील ट्रांसफार्मर जळून खाक झाल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली. यानंतर संबंधित भागात काही काळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, इराणच्या यंत्रणांनी तातडीने दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे इराणच्या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इस्फाहन प्रांतातच इराणचा नातांझ हा सर्वात महत्त्वाचा अणुप्रकल्प आहे. रविवारी आग लागलेल्या वीज प्रकल्पातून नातांझ अणुप्रकल्पाला वीज पुरवठा केला जातो.

Iran-Blastयानंतर पुढच्या काही तासात इराणच्या वायव्य प्रांतातील मोबाईल कंपनीच्या कारखान्याला मोठी आग लागली. या आगीत सदर कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्‍पाच्या आवारात आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. त्यामुळे इराणची यंत्रणा या संशयास्पद आगींबाबत लपवाछपवी करीत असल्याचे दिसत आहे. रविवारच्या या दोन्ही घटनांच्या आधी इराणच्या दक्षिणेकडील अहवाझ प्रांतातील इंधन पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन आग भडकल्याची माहिती समोर आली होती. इराणच्या यंत्रणांनी या आगींचे नेमके कारण उघड केलेले नाही. त्यामुळे या संशयास्पद आगींमागचे गुढ अधिकच वाढत चालले आहे.

गेल्या महिन्याभरात इराणमधील आठ ठिकाणी संशयास्पदरित्या आगी भडकल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजधानी तेहरान जवळील क्षेपणास्त्र साठा असलेले लष्करी तळ आणि नातांझ अणुप्रकल्पाचा समावेश आहे. त्याचबरोबर वीजप्रकल्प, रासायनिक कारखाना आणि बुशहर बंदरातील जहाजनिर्मितीच्या ठिकाणी आठ भडकली होती. यापैकी नातांझ अणुप्रकल्पात लागलेल्या आगीने सार्‍या जगाचे लक्ष वेधले होते. इराणच्या सरकारने आगीचे नेमके कारण अजूनही उघड केलेले नाही. मात्र, इस्रायलने सायबर हल्ले घडवून नातांझ अणुप्रकल्पात आग भडकवल्याचा आरोप अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला होता.

Iran-Blastयानंतर इराणने देखील नातांझ अणुप्रकल्पात लागलेला आगीमागे इस्रायल असल्याचे उघड झाल्यास प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. मात्र, सुरक्षेचे कारण सांगत इराणचे सरकार यावर अधिक बोलण्यास नकार देत आहेत. इराणच्या अणुप्रकल्पाला आवश्यक असलेल्या प्रगत सेंट्रीफ्यूजेसची निर्मिती नातांझ प्रकल्पात केली जाते. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला सदर प्रकल्पात लागलेल्या संशयास्पद आगीने येथील सेंट्रीफ्यूजेसचे मोठे नुकसान केले असून इराणचा अणुकार्यक्रम दोन ते तीन वर्ष मागे ढकलला गेल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, कोरोनाव्हायरसचा इराणमधील वाढता फैलाव, ढासळती अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचे निर्बंध यांच्यामुळे संतप्त इराणी जनतेने रोहानी सरकारविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून इराणच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू असून या निदर्शनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी इराण सरकारने रिव्होल्युशनरी गार्ड्सना तैनात केले आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात इराणच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद आगींबाबत रोहानी सरकार करीत असलेल्या लपवाछपीवीचे पडसादही या निदर्शनांमध्ये उमटत आहेत.

leave a reply