इराणमध्ये संशयास्पद आग, स्फोटांची मालिका सुरूच

तेहरान – इराणची राजधानी तेहरानजवळील औद्योगिक भागात आग भडकल्याचे समोर आले आहे. या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून इराणच्या लष्करी आणि नागरी ठिकाणांना लागलेल्या संशयास्पद आणि अनुत्तरीत आगींत आणखी एका घटनेची भर पडली आहे.

इराणमध्ये संशयास्पद आग, स्फोटांची मालिका सुरूचइराणच्या पारदिस प्रांतातील जाजरुद येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी आग भडकली होती. अग्नीशमनदलाने घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच या घटनेची चौकशी सुरू केल्याचे जाहीर केले होते. पण तीन दिवस उलटल्यानंतरही या आगीमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात घडलेल्या इतर संशयास्पद घटनांप्रमाणे या घटनेकडे देखील संशयाने पाहिले जात आहे.

तर गेल्या आठवड्यात पर्शियन आखातातील ‘केशम’ बेटावर संशयास्पद स्फोट झाल्याचा दावा केला जातो. इराण सरकारने या बेटाला भूकंपाचा हादरा बसल्याचे जाहीर केले. पण रात्री दहा नंतर या बेटावर स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचे आणि त्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. त्यामुळे इराणी यंत्रणा या घटनांबाबत माहिती दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे

इराणमध्ये संशयास्पद आग, स्फोटांची मालिका सुरूचइराणच्या दक्षिणेकडे पर्शियन आखातात असलेले ’केशम’ बेट सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या बेटावर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‍सचे तळ असून या बेटावरुन इंधनाचा अवैध व्यापारही केला जातो. गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिराततून (युएई) निघालेल्या इंधनवाहू जहाजाचे अपहरण करुन याच बेटावर आणण्यात आले होते. तर ४०० अब्ज डॉलर्सच्या सहकार्यांतर्गत इराण चीनला या बेटाचा ताबा देणार असल्याचेही बोलले जाते. अशा परिस्थितीत या बेटावर झालेल्या स्फोटाकडे संशयाने पाहिले जात आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून इराणमध्ये आग आणि स्फोटांची मालिका सुरू आहे. इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात लागलेल्या संशयास्पद आगीने इराणचा अणुकार्यक्रम दोन वर्षांसाठी मागे पडल्याचेही बोलले जाते. इराणच्या लष्करी तसेच नागरी ठिकाणांना लागणार्‍या या संशयास्पद आगी तसेच स्फोटांमागे इस्रायल असल्याचा आरोप काही माध्यमांनी केला होता. पण इराणची राजवट या घटनांचा खुलासा करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या घटनांमागील गुढ अधिकच वाढत चालले आहे.

दरम्यान, इराणच्या झहेदान शहरात चार पोलिस जवानांवर ’स्टन ग्रेनेड’चा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात चारही जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

leave a reply