इस्रायलने नवे हवाई हल्ले चढविल्याचा सिरियाचा आरोप

हवाई हल्लेदमास्कस – इस्रायलने अलेप्पोमध्ये जोरदार हवाई हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन संरक्षण मंत्रालयाने केला. नफ्ताली बेनेट यांनी इस्रायलची सूत्रे हाती घेतल्यानंतर इस्रायलने सिरियात चढविलेला हा पहिला हल्ला असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला. तर चीनने सिरियासाठी आर्थिक सहाय्य जाहीर केल्यानंतर इस्रायलने हे हल्ले चढविल्याचा ठपका सिरियाने ठेवला आहे. इस्रायली लष्कराने सिरियाच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

हवाई हल्लेइस्रायलच्या लढाऊ विमानांनी दोन दिवसांपूर्वी सिरियाच्या अलेप्पो प्रांतातील अल-सफिरा भागात हल्ले चढविले. चार एफ-16 विमानांनी एकूण आठ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा सिरियास्थित रशियन लष्कराने केला. सिरियन लष्कराने यापैकी सात क्षेपणास्त्रे भेदले, तर उर्वरित क्षेपणास्त्र अल-सफिरा येथील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसच्या ठिकाणावर कोसळले, अशी माहिती रशियन लष्कराने दिली. या हल्ल्यात अल-सफिरा येथील तळाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत.

दरम्यान, सिरिया आणि चीनमधील वाढत्या आर्थिक सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलने हा हल्ला चढविल्याचा आरोप सिरियाने केला. गेल्या आठवड्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी सिरियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांची भेट घेतली. सिरियाला आर्थिक सहाय्य देण्याबरोबरच सिरियाचे सार्वभौमत्त्व, अखंडतेला चीनचा पाठिंबा असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे खवळलेल्या इस्रायलने हा हल्ला चढविल्याचा ठपका सिरियाने केला.

इस्रायल आणि चीनमध्ये तीन दशकांचे व्यापारी सहकार्य आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने इस्रायलविरोधात जाहीर भूमिका स्वीकारली आहे. हमास या दहशतवादी संघटनेबरोबरील संघर्षातही चीनने इस्रायलवर टीका केली होती. तर संयुक्त राष्ट्रसंघात चीनने इस्रायलविरोधात मतदान केले होते. गेल्या आठवड्यात उघुरवंशियांच्या मुद्यावर चीनविरोधी ठरावाला समर्थन देऊन इस्रायलने देखील आपली नाराजी व्यक्त केल्याचा दावा केला जातो.

leave a reply