सिरियाने इस्रायलची 22 क्षेपणास्त्रे पाडली

- रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा

22 क्षेपणास्त्रेदमास्कस/मॉस्को – दोन दिवसांपूर्वी इस्रायलने सिरियामध्ये जोरदार हवाई हल्ले चढविले. पण रशियन बनावटीच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलचे 22 क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीरित्या भेदले, असा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याचे रशियाचे म्हणणे आहे. पण इस्रायलच्या या हल्ल्यांमध्ये चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने दिली.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दोन दिवसांपूर्वी सिरियाची राजधानी दमास्कस आणि होम्स जवळच्या भागात हल्ले चढविले. यासाठी इस्रायली विमानांनी लेबेनॉनच्या हवाईहद्दीचा वापर केल्याचा आरोप सिरियन वृत्तवाहिनीने केला होता.

लेबेनॉनच्या यंत्रणांनी देखील दोन इस्रायली विमानांनी राजधानी बैरूतवरुन उड्डाण केल्याचे सांगून सिरियन आरोपांना दुजोरा दिला होता. इस्रायलने पुन्हा यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

22 क्षेपणास्त्रेया हवाई हल्ल्यांमध्ये दमास्कसजवळील इराणसंलग्न हिजबुल्लाहचे कारा भागातील शस्त्रास्त्रांचे गोदाम नष्ट झाले. तर होम्सजवळील हल्ल्यातही हिजबुल्लाहच्या गोदामालाच लक्ष्य केल्याचा दावा ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे चार दहशतवादी ठार तर डझनहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती या मानवाधिकार संघटनेने दिली होती. पण आपली जीवितहानी झालीच नसल्याचे सांगून हिजबुल्लाहने हे दावे नाकारले होते.

त्याचवेळी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने इस्रायलच्या हल्ल्यांबाबत नवे दावे केले. इस्रायलने सिरियावर 24 क्षेपणास्त्रे डागली होती. यापैकी 22 क्षेपणास्त्रे सिरियाच्या ‘बक-एम2ई’ आणि ‘पंटसिर-एस’ या हवाई सुरक्षा यंत्रणेने भेदली, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

तसेच उर्वरित दोन क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नसल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. याआधी रशियाची हवाई सुरक्षा यंत्रणा इस्रायलच्या हल्ल्यांविरोधात वापरल्याचा दावा सिरियन लष्कराने केला होता. पण यावेळी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली.

leave a reply