चीनच्या अणुप्रकल्पातील फ्युअल रॉड्सचे नुकसान – चिनी अणुसंशोधकाचा संशयास्पद मृत्यू

बीजिंग – हॉंगकॉंगपासून अवघ्या १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त केली जात होती. चीन या घटनेवर पडदा टाकत असून आणखी एक चेर्नोबिल दुर्घटना प्रतिक्षेत असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला होता. पण चीनच्या पर्यावरण मंत्रालयाने अमेरिकी माध्यमांचा हा दावा फेटाळला. ताईशानमधील पाच फ्युअल रॉड्सचे नुकसान झाल्यामुळे अणुप्रकल्पात ‘नोबल गॅसेस’ बाहेर पडल्याचे चीनने मान्य केले. दरम्यान, चीनच्या या कबुलीला काही तास उलटत नाही तोच, ‘चायनिज न्यूक्लिअर सोसायटी’चे उपाध्यक्ष झँग झिजियान यांचा संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आली आहे.

फ्युअल रॉड्सचे नुकसान

चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडॉंग प्रांतातील ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग झाल्याचे अमेरिकेच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते. यासाठी सदर वृत्तवाहिनीने ताईशानमधील भागीदारी असणार्‍या फ्रेंच कंपनी आणि अमेरिकी यंत्रणांमध्ये झालेल्या पत्र व्यवहारांचा दाखला दिला होता. काही आठवड्यांपूर्वी येथील दोनपैकी एका प्रकल्पातून फ्युजन गॅसची गळती होत असून सुरक्षेच्यादृष्टीने हा चिंतेचा विषय ठरू शकतो, असे एका पत्रात म्हटले होते.

फ्युअल रॉड्सचे नुकसानताईशान प्रकल्प मकावपासून ६० तर हॉंगकॉंगपासून १३० किलोमीट अंतरावर आहे. याशिवाय हा प्रकल्प साऊथ चायना सीजवळ असल्यामुळे आण्विक गळतीची बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी उचलून धरली. अमेरिकी माध्यमांनी याची तुलना १९८६ सालच्या सोव्हिएत रशियातील चेर्नोबिल अणुप्रकल्पातील दुर्घटनेशी केली होती. तेव्हाही चेर्नोबिलमधील अणुप्रकल्पातून झालेल्या गळतीने ५० जणांचा बळी गेल्याचे सोव्हिएत रशियाने जाहीर केले होते.

फ्युअल रॉड्सचे नुकसानअमेरिकी माध्यमांमधील या बातमीने कोंडीत सापडलेल्या चीनने अणुप्रकल्प निकषांनुसार योग्य प्रकारे सुरू असल्याचे जाहीर केले होते. पण दोन दिवसांपूर्वी चीनच्या पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी वेगळीच माहिती प्रसिद्ध केली. ताईशानच्या एक क्रमांकाच्या प्रकल्पातील पाच फ्युअल रॉड्सचे नुकसान झाल्याचे चिनी मंत्रालयाने जाहीर केले. यामुळे प्रकल्पात नोबल गॅसचे उत्सर्जन झाले असून यामुळे पर्यावरणाला फारसा धोका नसल्याचा दावा चीनने केला.

ताईशान अणुप्रकल्पाबाबत चीनने दिलेल्या या स्पष्टीकरणाला काही तास उलटत नाही तोच चीनच्या वरिष्ठ अणुसंशोधकांच्या मृत्यूची बातमी समोर आली. चायनिस न्यूक्लिअर सोसायटी तसेच हार्बिन इंजिनिअरिंग विद्यापीठाचे उपाध्यक्ष झँग झिजियान यांचा हेलॉंगजियांग प्रांताची राजधानी हार्बिन येथे दुर्दैवी मृत्यू झाला. राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेऊन झँग यांनी आत्महत्या केल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. ही आत्महत्या आहे, त्यांचा खून झालेला नाही, असा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. झँग झिजियान हे चीनमधील प्रख्यात अणुसंशोधक होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना चीनमधील सर्वोच्च तंत्रज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू आणि चीनच्या अणुप्रकल्पातील गळती यांचा संबंध असावा, असा दाट संशय माध्यमांकडून व्यक्त केला जात आहे.

leave a reply