चीनच्या आक्रमक कारवाया रोखण्यासाठी तैवान व जपानच्या हालचाली

तैपेई/टोकियो – चीनकडून सागरी क्षेत्रात सुरू असणारी घुसखोरी तसेच इतर आक्रमक कारवाया रोखण्यासाठी तैवान आणि जपानने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तैवानने आपल्या आठ हजार जवानांसह ‘हान कुआंग’ लष्करी सराव सुरू केला आहे. त्याचवेळी जपानने प्रगत ‘अँटी शिप मिसाईल’ विकसित केल्याचे वृत्त समोर आले असून त्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अमेरिकेने साऊथ चायना सीच्या मुद्द्यावर चीनविरोधात भूमिका जाहीर केल्यानंतर घडलेल्या या घडामोडींनी लक्ष वेधून घेतले आहे.

China-Japan-Taiwanगेल्या काही महिन्यांपासून चीनकडून सातत्याने तैवानला धमकावण्यात येत आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीतही तैवानवर हल्ला चढवण्याची उघडपणे मागणी करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय समुदाय कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत असताना तैवान ताब्यात घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत काही चिनी नेते व लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. चीनकडून तैवानच्या हद्दीत लढाऊ विमाने तसेच बोटी पाठवून घुसखोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. चीनकडून टाकण्यात येणाऱ्या या दडपणाच्या पार्श्वभूमीवर, तैवानने सुरू केलेला लष्करी सराव महत्त्वाचा ठरतो.

‘हान कुआंग’ नावाच्या या सरावात, तैवानच्या संरक्षणदलांच्या सर्व तुकड्यांसह ‘रिझर्व्ह फोर्स’ व तटरक्षक दलही सहभागी झाले आहे. ‘लाईव्ह फायर एक्सरसाईझ’ प्रकारातील या सरावामध्ये, शत्रूचा सागरी भागात झालेला हल्ला परतवता येणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यात ‘एफ-१६’ लढाऊ विमाने, ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, ‘पॅट्रिऑट मिसाईल सिस्टीम’, बॅलिस्टिक मिसाईल्स, अँटी शिप मिसाईल्स, हेवी टोर्पेडोज व ‘अटॅक सबमरीन्स’चा समावेश होता अशी माहिती तैवानी सूत्रांनी दिली.

China-Japan-Taiwanतैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई इंग वेन’ ‘लाईव्ह फायर एक्सरसाईझ’ला उपस्थित होत्या. ‘देशाची सुरक्षा संरक्षणदलाच्या बळकटीवर निर्भर असते. हान कुआंग सरावातून केवळ तैवानच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन होत नाही तर देशाच्या सुरक्षेसाठी आमचा निर्धार किती प्रखर आहे याचीही प्रचिती येते’, या शब्दात तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला टोला लगावला. सराव सुरू असताना चीनच्या नौदलाकडून टेहळणीचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही तैवानकडून करण्यात आला आहे.

तैवानचा सराव सुरू असतानाच जपानच्या संरक्षणदलांनी नव्या ‘अँटी शिप मिसाइल’चे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. ‘एएसएम-३’ हे सुपरसॉनिक प्रकारातील मिसाईल असून याचा वेग ध्वनीच्या तीनपट म्हणजेच ‘मॅक३’ इतका असून त्याचा टप्पा सुमारे ४०० किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. जपानच्या ‘मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज’कडून हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले असून, सध्या हवाईदलात कार्यरत असणाऱ्या ‘एफ-२’ या लढाऊ विमानासह ‘एफ-३’ या नव्या स्टेल्थ जेटमध्ये ‘एएसएम-३’ तैनात करण्यात येणार आहे. चीनच्या प्रगत युद्धनौका व विनाशिकांचा धोका लक्षात घेऊन हे नवे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आल्याची माहिती जपानी सूत्रांनी दिली.

leave a reply