क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांद्वारे तैवानचे चीनच्या युद्धसरावाला प्रत्युत्तर

तैपेई/बीजिंग – तैवानने क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका लावला आहे. या देशाने बुधवारपासून सुरू केलेल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या पुढील दोन आठवडे सुरू असतील. यामध्ये तैवान चीनला लक्ष्य करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या चाचणीचाही समावेश आहे. चार दिवसांपूर्वीच चीनने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात महिनाभर चालणार्‍या युद्धसरावाची घोषणा केली होती. त्यानंतर तैवानने क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती उघड करून चीनला इशारा दिल्याचे दिसते.

तैवानच्या ‘काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड तैवान फिशरिज् एजन्सीज्’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 3 मार्चपासून तैवानने आपल्या क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू केली आहे. ‘नॅशनल चूंग-शॅन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’ या तैवानच्या शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान विकसित करणारे विभाग ही चाचणी घेत आहे. बुधवारी आणि गुरुवारी दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली तर 10 ते 19 मार्चच्या दरम्यान चार किंवा पाच क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येईल.

गेल्या दोन दिवसांमध्ये चाचणी घेतलेल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 300 किलोमीटर इतकी आहे. तर पुढच्या आठवड्यापासून चाचणी केली जाणारी क्षेपणास्त्रे 600 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतात. यामध्ये ‘हायुंग फेंग 2-ई’ क्रूझ् क्षेपणास्त्र आणि ‘थंडरबोल्ट-2000 या ‘टॅक्टिकल रॉकेट’चा समावेश आहे. ही क्षेपणास्त्रे तैवानच्या विरूद्ध दिशेला असलेल्या चीनच्या फुजियान प्रांतात खोलवर मारा करू शकतात.

तैवानच्या या क्षेपणास्त्रांची दखल चीनने घेतली आहे. म्हणूनच चीनने तैवानच्या क्षेपणास्त्रांची क्षमता जाणून घेण्यासाठी ‘डाँग फँग हाँग 3’ संशोधक जहाज ‘साऊथ चायना सी’ व तैवानच्या आखाताजवळ आणून ठेवले आहे. या व्यतिरिक्त तैवानने सोमवारपासून प्रातास बेटावर ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावही आयोजित केला होता.

तेच तैवाने 23 मार्च रोजी तैपिंग बेटावर युद्धसरावाचे आयोजन केले आहे. ही दोन्ही बेटे ‘साऊथ चायना सी’च्या हद्दीत येतात व या सागरी क्षेत्रावर तसेच तैवानवर आपला सार्वभौम अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र चाचणी आणि युद्धसरावाचे आयोजन करून तैवान चीनला इशारा देत असल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत.

चार दिवसांपूर्वीच चीनने ‘साऊथ चायना सी’च्या हद्दीत महिनाभर चालणार्‍या युद्धसरावाची घोषणा केली आहे. चीनच्या हैनान प्रांताच्या सागरी हद्दीजवळ हा युद्धसराव सुरू असला तरी चीनने सदर युद्धसरावापासून पाच किलोमीटर अंतराच्या क्षेत्रात परदेशी जहाजांच्या प्रवास किंवा गस्तीवर बंदी घोषित केली आहे. अशावेळी तैवानने थेट चीनला लक्ष्य करू शकणार्‍या क्षेपणास्त्रांची चाचणी करून जिनपिंग यांच्या आक्रमक राजवटीला इशारा दिला आहे.

दरम्यान, तैवानबरोबर सलोखा निर्माण करून तैवानला चीनमध्ये सामील करण्यासाठी आपल्या राजवटीचे प्रयत्न सुरू राहतील, अशी घोषणा चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांनी केली आहे. त्याचवेळी स्वतंत्र तैवानसाठी सुरू असलेले कुठलेही प्रयत्न चीन खपवून घेणार नाही, असे प्रयत्न चीन हाणून पाडेल, अशी धमकी चीनच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी दिली.

leave a reply