तैवानची सुरक्षा जपानशी जोडलेली आहे – जपानचे संरक्षणमंत्री नोबूआ किशी

टोकिओ – चीनमध्ये विलिनीकरण हा तैवानसमोर एकमेव पर्याय ठरतो, तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाला निमंत्रण ठरेल, अशी धमकी चीनने दिली होती. या धमकीवर जपानने तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. ‘तैवानची शांतता व स्थैर्य जपानच्या सुरक्षेशी थेटपणे जोडलेल्या गोष्टी आहेत. चीन-तैवानमधील संबंधांवर तसेच चीनच्या लष्करी हालचालींवरही जपानची बारीक नजर आहे’, असा इशारा जपानचे संरक्षणमंत्री नोबूआ किशी यांनी दिला. जपान आणि अमेरिकेमध्ये वर्षातील सर्वात मोठा युद्धसराव सुरू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर, जपानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा लक्षवेधी ठरतो.

जपानचे संरक्षणमंत्री नोबूआ किशी यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा जपानशी जोडलेला आहे, याची जाणीव करून दिली. ‘आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर चीन तैवानचा ताबा घेऊ पाहत आहे’, अशी चिंता संरक्षणमंत्री किशी यांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात चीनने जपानच्या हवाई हद्दीत 28 विमानांची घुसखोरी घडवली होती. अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना, जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या या घुसखोरीला लक्ष्य केले. तैवान हा जपानसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. तैवानच्या सागरी क्षेत्रातून येणार्‍या इंधनवाहू जहाजांवर जपानची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, याकडे किशी यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी जपानने या क्षेत्रातील सुरक्षेसाठी युरोपिय महासंघानेही योगदान द्यावे, असे आवाहन केले होते.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांचे लहान बंधू असलेले नोबूआ किशी हे चीनविरोधी तसेच तैवानचे समर्थक म्हणून ओळखले जातात. एप्रिल महिन्यात संरक्षणमंत्री किशी यांनी तैवानजवळच्या योनागुनी बेटाला भेट दिली होती. या भेटीनंतर जपानी माध्यमांशी बोलतानाही किशी यांनी तैवानच्या विरोधात चीनने सुरू केलेल्या लष्करी हालचालींवर सडकून टीका केली होती. चीनने तैवानचा ताबा घेतला तर या क्षेत्रातील परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल व ते जपानच्या सुरक्षेसाठी धोकादायक असेल. जपानच्या संरक्षणदलाने या परिस्थितीसाठी तयार रहावे, असे आदेश संरक्षणमंत्री किशी यांनी आपल्या लष्कराला दिले होते. यानंतर संतापलेल्या चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने संरक्षणमंत्री किशी यांच्यावर टीका केली होती.

गेल्या वर्षी तैवानमध्ये पार पडलेल्या निवडणूकीत राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांचा विजय झाल्यानंतर, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किशी यांनी तैवानला भेट दिली होती. याशिवाय गेल्या वर्षी तैवानचे पहिले लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष ली तेंग-हुई यांच्या मृत्यूवेळीही किशी यांनी तैवानचा दौरा केला होता. किशी यांनी आपले थोरले बंधू अ‍ॅबे यांच्या प्रमाणेच तैवानबरोबरच्या संबंधांना विशेष महत्व दिले आहे. अमेरिकेबरोबर पार पडलेल्या ‘टू प्ल्स टू’ चर्चेतही संरक्षणमंत्री किशी यांनी तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानबाबत केलेल्या विधानांमुळे चीन अस्वस्थ होऊ शकतो.

संरक्षणमंत्री किशी यांनी चीनच्या वाढत्या संरक्षणखर्चावर टीका केली व यातला अपारदर्शकतेचा मुद्दा ही उपस्थिथ केला. त्याचबरोबर, जपान आपल्या सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी दोन विनाशिका एजिस हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज करणार असल्याची माहिती किशी यांनी दिली. तर जपान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या लोकशाहीवादी देशांची क्वाड संघटना कुठल्याही देशाच्या विरोधात नसल्याचे किशी म्हणाले. पण इंडो-पॅसिफीक क्षेत्रातील मुक्त सागरी क्षेत्राच्या सुरक्षेवरच्या मुद्यावर हा गट उभा राहिल्याचा दावा किशी यांनी केला. याशिवाय, जपान इतर देशांना पुरवित असलेले संरक्षणविषयक सहकार्य यामुळे शांतता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सुरक्षा अधिक भक्कम होणार असल्याचे किशी यांनी या मुलाखतीत सांगितले.

दरम्यान, चीन उघडपणे तैवानचा ताबा घेण्याच्या धमक्या देत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चीनने तैवानजवळील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या असून युद्धनौका, लढाऊ तसेच अण्वस्त्रवाहू विमाने रवाना करुन चीनने तैवानसह अमेरिका व युरोपीय देशांना इशारे दिले होते. तैवानबाबतच्या चीनच्या या वाढत्या आक्रमकतेविरोधात अमेरिका, जी7, युरोपीय महासंघ तसेच नाटोमध्येही प्रतिक्रीया उमटल्या. यामुळे बिथरलेल्या चीनने अमेरिकेला धमकावले होते. तैवानसंदर्भातील चीनच्या कोणत्याही निर्णयात अमेरिका हस्तक्षेप करू शकत नाही, अशी धमकी चीनच्या लष्कराने दिली. अशा परिस्थितीत, जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा थेट जपानशी जोडून चीनची मनमानी खपवून घेणार नाही, असे बजावल्याचे दिसत आहे.

leave a reply