चीनच्या आक्रमकतेत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असताना तैवानची ऑस्ट्रेलियाकडे सहकार्याची मागणी

सहकार्याची मागणीतैपेई/कॅनबेरा/बीजिंग – चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून तैवानविरोधातील कारवायांची व्याप्ती अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी तब्बल ५२ चिनी विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली. चिनी विमानांनी इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. चीनकडून सातत्याने सुरू असलेल्या या घुसखोरीच्या पार्श्‍वभूमीवर, तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने अधिक सहाय्य करावे, अशी मागणी केली आहे.

शुक्रवार ते रविवार या ७२ तासांमध्ये चीनच्या तब्बल ९३ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतरही चीनकडून तैवानवरील दडपण अधिकच वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सोमवारच्या घुसखोरीवरून समोर आले आहे. सोमवारी घुसखोरी करणार्‍या विमानांमध्ये ३४ ‘शेनयांग जे-१६ फायटर जेट्स’सह १२ ‘एच-६ बॉम्बर्स’, दोन ‘शांक्सी वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्टस्’, दोन ‘केजे-५०० एअरबोन अर्ली वॉर्निंग ऍण्ड कंट्रोल एअरक्राफ्टस्’ व दोन ‘एसयु-३० जेटस्’चा समावेश होता.

सहकार्याची मागणीचीनच्या या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानच्या हवाईदलाने तात्काळ लढाऊ गस्तीविमाने धाडली. त्यापाठोपाठ रेडिओ वॉर्निंग देण्याबरोबरच ‘मिसाईल सिस्टिम’ तैनात केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. पुढील आठवड्यात तैवान ‘नॅशनल डे’ साजरा करणार आहे. यानिमित्त तैवानच्या संरक्षणदलांकडून व्यापक प्रमाणात युद्धसराव तसेच संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षणखर्चात करण्यात येणार्‍या मोठ्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर हा सराव महत्त्वाचा मानला जातो. चीनकडून विक्रमी स्तरावर सुरू झालेली घुसखोरी ‘नॅशनल डे’ तसेच सरावात अडथळे आणण्याचा तसेच दडपण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचा दावा तैवानमधील विश्‍लेषक करीत आहेत.

चीनच्या कारवायांची तीव्रता वाढत असतानाच तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी, ऑस्ट्रेलियाकडे अधिक सहाय्याची मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, गोपनीय माहिती तसेच सुरक्षेच्या मुद्यावर अधिक सहकार्य व देवाणघेवाण अपेक्षित असल्याचे परराष्ट्रमंत्री वु यांनी म्हटले आहे. ‘तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी तैवान सरकारवरच आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र चीनविरोधात युद्धाची तयारी करताना ऑस्ट्रेलियासारख्या लोकशाहीवादी देशांचे सहाय्य मिळणे अधिक उपयुक्त ठरेल’, असे तैवानी परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाबरोबरील तैवानचे संबंध चांगले असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

सहकार्याची मागणीगेल्या महिन्यात, अमेरिका व ऑस्ट्रेलियाची ‘टू प्लस टू’ बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर दोन्ही देशांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात, तैवानबरोबरील संबंध अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांना वेग देण्याचे ग्वाही दिली होती. अमेरिका व ब्रिटनने ऑस्ट्रेलियाबरोबर ‘ऑकस डील’ही केली असून त्यानुसार, ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या पुरविण्यात येणार आहेत. तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याची प्रशंसा करताना, यामुळे ऑस्ट्रेलियाचा ‘इंडो-पॅसिफिक’मधील वावर अधिक वाढेल, असा दावा केला.

दरम्यान, चीनच्या ‘पीएलए’कडून पाठविण्यात येणारी विमानांची वाढती संख्या म्हणजे आक्रमणाची तयारी असल्याचा दावा सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने केला आहे. सातत्याने पाठविण्यात येणार्‍या विमानांमुळे चिनी वैमानिकांना तैवानच्या परिसराची चांगली ओळख झाली असून, हल्ल्याचे आदेश दिल्यास ते अनुभवी वैमानिकाप्रमाणे कारवाई करतील, असा दावा ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात करण्यात आला आहे.

leave a reply