कोरोनाशी लढत असताना भारताला तैवानचे सहाय्य, चीनकडून चिथावणी

नवी दिल्ली – तैवानने १५० ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर्स, ५०० ऑक्सिजन सिलेंडर्स भारतासाठी धाडले आहेत. तैवानकडून भारतीय जनतेला हे स्नेहाची भेट असल्याचे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अधिकृत पातळीवर भारताचे तैवानशी संबंध नसताना देखील, तैवानने केलेले हे सहकार्य महत्त्वाचे ठरते. तर वरकरणी भारतावर आलेल्या या कोरोनाच्या संकटावर दुःख व्यक्त करणार्‍या चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या ‘सेंट्रल पोलिटिकल अँड लिगल अफेअर्स’ने या संकटाच्या काळात भारताला चिथावणी देणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर टाकली होती. कालांतराने ही पोस्ट मागे घेऊन त्यावर दिलगिरी व्यक्त करण्यात आली असली, तरी चीनच्या राजवटीची भारतद्वेष्टी भूमिका यामुळे पुन्हा एकदा उघड झाली आहे.

कोरोनाची पहिली लाट आलेली असताना, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध व इतर वैद्यकीय साहित्य यांचा भारताने केलेल्या पुरवठ्याची कृतज्ञतापूर्ण आठवण ठेवून जगभरातील प्रमुख देश आत्ता भारताला आवश्यक असलेले सहाय्य पुरवित आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही भारताने केलेल्या सहकार्याचा उल्लेख करून आता अमेरिका भारताच्या मागे उभी राहणार असल्याचे जाहीर केले होते. रशिया, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, बेल्जियम हे देश भारताला आवश्यक असलेले सहाय्य पुरवित आहेत. आखाती देशांनीही भारताला सहाय्य पुरविले आहे. तैवानने देखील भारतासाठी १५० ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर्स, ५०० ऑक्सिजन सिलेंडर्स धाडले आहे. हे सहाय्य घेऊन विमान तैवानमधून निघालेले आहे, अशी माहिती तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. चीनच्या ‘वन चायना’ धोरणानुसार तैवान हा स्वतंत्र देश मानला जात नाही. तर तो चीनच्या अधिपत्याखालील भाग असल्याचे मानले जाते.

ही वन चायना पॉलिसी जगभरातील इतर देशांप्रमाणेच भारतानेही मान्य केलेली आहे. यामुळेच भारताचे तैवानबरोबर अधिकृत पातळीवर संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. मात्र चीन वारंवार भारताच्या हितंसबंधांना आव्हान देऊ लागल्यानंतर, भारताने तैवानबरोबरील संबंध वाढविण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. तर लोकशाहीवादी भारताकडून आपल्याला फार मोठ्या अपेक्षा असल्याचे संकेत तैवानकडून सातत्याने दिले जात आहेत. अशा परिस्थितीत तैवानकडून भारतासाठी पाठविण्यात आलेले हे सहाय्य महत्त्वाचे ठरते. याआधी तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार्‍या पॅराग्वे या देशाला भारताने एक लाख कोरोना प्रतिबंधक लसी पुरविल्या होत्या. यासाठी तैवानने भारताचे आभार मानून प्रशंसा केली होती.

त्या पार्श्‍वभूमीवर आत्ता भारताला तैवानकडून मिळत असलेले सहाय्य राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. तैवान भारताला हे सहाय्य करीत असताना, चीनची भारताबाबतची मानसिकता आणखी एकवार जगजाहीर झाली आहे. आकाशात झेपावणारे रॉकेट आणि भारतातील स्मशानातील चिता यांचे फोटोग्राफ बाजूला लावलेली पोस्ट चीनच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. चीनवर एकछत्री सत्ता गाजविणार्‍या कम्युनिस्ट पार्टीच्या ‘सेंट्रल पोलिटिकल अँड लिगल अफेअर्स’च्या अधिकृत हँडलवरून ही पोस्ट करण्यात आली होती. ह्या असंवेदनशील व अश्लाध्य प्रकारावर चीनच्या जनतेनेही टीका केली होती. यावर प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर ही पोस्ट मागे घेण्यात आली. संबंधित चिनी अधिकार्‍याने या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. याआधीही चीनच्या अधिकृत माध्यमांनी भारताचे अशारितीने विकृत चित्रण करण्याचा प्रयत्न केला होता. भारत कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना, पाश्‍चिमात्य माध्यमेही भारताचे विपर्यास्त चित्रण करीत आहेत. मात्र भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात अमेरिकेत कोरोनाचे बळी गेलेले आहेत, याची आठवण करून देऊन काही जबाबदार अमेरिकन विश्‍लेषकांनी या प्रकरणी आपल्या माध्यमांवर टीका केली आहे. भारताची जनसंख्या व या जनसंख्येची घनता अतिशय अधिक आहे, याकडे या विश्‍लेषकांनी लक्ष वेधले होते. तरीही भारताच्या यंत्रणा या समस्येशी सर्व शक्ती पणाला लावून मुकाबला करीत आहे, ही प्रशंसा करण्याजोगी बाब ठरते, त्याची जगाने दखल घ्यावी, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply