भारताच्या राजनैतिक अधिकार्‍यांकडून धडे घ्या

- पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आपल्या राजदूतांना टोला

धडेइस्लामाबाद – भारताची प्रशंसा करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या राजदूतांची कानउघडणी केली. भारताचे राजदूत दुसर्‍या देशांमधून गुंतवणूक मिळवतात आणि परदेशातील भारतीयांना सन्मान देऊन हवे ते सहाय्य देखील करतात. हे कसे करायचे याचे धडे भारताच्या राजदूतांकडून घ्या, असे इम्रान खान यांनी आपल्या राजदूतांना सुनावले. त्याचे पडसाद पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये उमटले आहेत. वरिष्ठ राजकीय अधिकार्‍यांनी यावर नाराजी व्यक्त केली. जाहीरपणे केलेली ही टीका पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकार्‍यांचा अपमान करणारी असल्याचे राजनैतिक अधिकारी व माध्यमांचेही म्हणणे आहे.

Advertisement

पुढच्या काळात कुठल्याही देशात भारत आणि पाकिस्तानचे राजदूत एकमेकांसमोर आले, तर पाकिस्तानच्या राजदूताची मान खाली गेलेली असेल. कारण पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच त्यांच्यावर तशी वेळ आणलेली आहे, अशी टीका पाकिस्तानच्या पत्रकारांनी केली आहे. पंतप्रधानांचा हेतू व त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा कितीही चांगला असला, तरी राजनैतिक स्तरावरील गोष्टींची जाहीरपणे वाच्यता केली जात नाही, असे पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुआ यांनी म्हटले आहे. तसे करून इम्रान खान यांनी आपल्याला परराष्ट्र मंत्रालयाच्या कारभाराची समज नसल्याचे दाखवून दिले, असा ठपका तेहमिना जंजुआ यांनी ठेवला.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव सलमान बशिर यांनीही पंतप्रधानांची ही टीका पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकार्‍यांचा आत्मविश्‍वास ढासळवून टाकणारी आहे, असे म्हटले आहे. त्याचवेळी भारतीय माध्यमांनी ही बाब उचलून धरली आहे, याकडेही पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी व पत्रकार लक्ष वेधत आहेत. याआधीही इम्रान?खान यांनी आपली अपरिपक्वता दाखवून दिली होती. पण ते ही टीका करीत असताना, त्यांच्या शेजारी बसलेल्या परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तरी पंतप्रधानांना रोखायला हवे होते, अशी अपेक्षा काहीजणांनी व्यक्त केली.

भारताने कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तान फार मोठी राजनैतिक मोहीम छेडून भारताला जेरीस आणणार असल्याचे दावे पंतप्रधान इम्रान?खान यांनी केले होते. पण पाकिस्तानच्या या प्रयत्नांना मित्रदेशांनीही साथ दिली नाही. उलट पुढच्या काळात पाकिस्तानचीच कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. हे परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश ठरते. भारताच्या परराष्ट्र धोरणाला मिळत असलेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे हे अपयश अधिकच नजरेत भरणारे आहे, अशी खंत पाकिस्तानची माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply