पॅलेस्टाईनच्या संघर्षाचा लाभ घेऊन काश्मीरचाही मुद्दा उपस्थित करा – पाकिस्तानच्या सरकारला पत्रकारांचा सल्ला

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या संसदेने इस्रायलच्या विरोधात निषेधाचा ठराव मंजूर केला. गाझातील हमासवर इस्रायल करीत असलेले हल्ले म्हणजे मानवाधिकारांचे हनन ठरते, असा ठपका ठेवणारा अहवाल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संसदेत सादर केला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने पॅलेस्टिनींवरील इस्रायलचे हल्ले थांबविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी या ठरावाद्वारे पाकिस्तानच्या संसदेने केली आहे. तर पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान राजा फारूख हैदर यांनी तर इस्रायल आणि भारताचे दिवस भरत आले आहेत, अशी धमकी दिली. तर पॅलेस्टाईनचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला असताना, त्याच्याशी काश्मीरचा प्रश्‍न जोडण्याची कल्पकता दाखवा, असा सल्ला काही पाकिस्तानी पत्रकार आपल्या सरकारला देत आहेत.

काश्मीरचा मुद्दाइस्रायलवर हजारो रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांचा मारा करणार्‍या हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांवरील इस्रायल कठोर कारवाई करीत आहे. या कारवाईच्या विरोधात पाकिस्तानमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पाकिस्तानचे सरकार पॅलेस्टिनींच्या बाजूने आणि इस्रायलच्या विरोधात काहीच करीत नाही, अशी जळजळीत टीका या देशातील कट्टरपंथिय करीत आहेत. केवळ शाब्दिक निषेध नोंदवून इस्रायलवर परिणाम होणार नाही, पाकिस्तानी लष्कराने हालचाली केल्याखेरीज इस्रायलवर दडपण येणार नाही, असे पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांवरील विश्‍लेषक सांगत आहेत. किमान पॅलेस्टिनींना शस्त्रे तरी पुरवा, अशी मागणी हे विश्‍लेषक पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारला सांगत आहेत.

अशा परिस्थितीत इस्रायलच्या विरोधात ठराव मंजूर करून पाकिस्तानच्या सरकारने या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे खरा. पण त्यावर या कट्टरपंथियांचे समाधान होण्याची शक्यता नाही. इस्रायलच्या विरोधात सारी शक्ती पणाला लावून पाकिस्तानने पॅलेस्टिनींना सहाय्य करावे, ही मागणी जोर पकडू लागली असून त्याचे प्रतिसाद या देशाच्या माध्यमांमध्येही उमटू लागले आहेत. पाकिस्तानसह इतर इस्लामधर्मिय देशांच्या सरकार व राजवटींवर पाकिस्तानची माध्यमे तुटून पडली आहेत. या सर्वच देशांनी इस्रायलच्या विरोधात लष्करी आघाडी उघडावी, अशी मागणी करण्यात पाकिस्तानचे पत्रकार सर्वात पुढे आहेत.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान राजा?मुहम्मद फारूख हैदर खान यांनी तर पॅलेस्टिनी आणि काश्मिरींवर अन्याय करणार्‍या इस्रायल व भारताचे दिवस भरल्याची धमकी दिली. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कौन्सिल’ (ओआयसी) या इस्लामधर्मिय देशांच्या संघटनेने इस्रायल व भारताच्या विरोधात कठोर पावले उचलावी, असे आवाहनही राजा मुहम्मद फारूख हैदर खान यांनी केले आहे. काही पाकिस्तानी पत्रकारांनीही पॅलेस्टाईनच्या बरोबरच काश्मीरचा प्रश्‍नही आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करा, असा सल्ला पाकिस्तानच्या सरकारला दिला.

गाझावरील इस्रायलच्या प्रतिहल्ल्यांमुळे पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सध्या चर्चेत आहे. याचा लाभ घ्यायचा असेल, तर काश्मीरचा मुद्दा पॅलेस्टाईनशी जोडायला हवा. त्याचा फार मोठा लाभ पाकिस्तानला मिळेल, असा तर्क या पत्रकारांनी मांडला आहे. हे दोन्ही प्रश्‍न स्वतंत्रपणे मांडल्यास त्याचा फारसा उपयोग होणार नाही आणि काश्मीरचा प्रश्‍न खूपच मागे पडेल, असे या पाकिस्तानच्या पत्रकारांनी बजावले आहे. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी इराण, तुर्की, इजिप्त व चीन या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर, पाकिस्तान इस्रायलशी लढण्यासाठी आपले लष्कर पाठविण्याची तयारी करीत असल्याच्या अफवाही पाकिस्तानमध्ये पसरल्या होत्या.

पाकिस्तानची माध्यमे व पत्रकार आणि विश्‍लेषक जनभावना भडकावणारी प्रक्षोभक मांडणी व मागण्या करीत असताना, या देशातील काही जबाबदार पत्रकारांनी मात्र अत्यंत प्रगल्भ भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे. काश्मीरचा प्रश्‍न सोडविण्यात अपयश आलेले इम्रान?खान यांचे सरकार, पॅलेस्टाईनचा प्रश्‍न सोडवतील, अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे ठरेल, असे पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या अँकरने म्हटले आहे. पाकिस्तानने आपली कुवत व क्षमता लक्षात?घेऊन पॅलेस्टाईनच्या प्रश्‍नावर भूमिका मांडावी, असा परखड सल्ला जबाबदार पत्रकार देत आहेत. अंतर्गत समस्या सोडवण्यात पाकिस्तानच्या सरकारला दारूण अपयश आले आहे. असे असताना पॅलेस्टाईनच्या प्रश्‍नात नाक खुपसून इस्रायलला आव्हाने देण्याने नक्की काय साधले जाईल, असा सवाल या पत्रकारांनी केला आहे.

तर काही कट्टरपंथिय विश्‍लेषकांनी मात्र पॅलेस्टाईनच्या नंतर इस्रायलचे पुढचे लक्ष्य पाकिस्तान असेल असे दावे ठोकले आहेत.

leave a reply