तालिबानने अफगाणिस्तानच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या

- पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा

इस्लामाबाद – अफगाणिस्तानने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत, असे सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानच्या अफगाणिस्तावरील ताब्याचे स्वागत केले. तर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आता आंतरराष्ट्रीय समुदायाला काबुलमधील तालिबानच्या राजवटीशी जुळवून घ्यावेच लागेल, असा दावा केला. यासाठी पाकिस्तान महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे सुचवून कुरेशी यांनी आपल्या देशाचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला.

तालिबानने अफगाणिस्तानच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या - पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावातालिबानच्या राजवटीमुळे अफगाणिस्तान अमेरिकेच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. दुसऱ्या देशाची संस्कृती स्वीकरणे म्हणजे तो देश आपल्यापेक्षा वरचढ आहे, हे मान्य करण्यासारखे ठरते, असे सांगून तालिबानची क्रूर व हिंसक राजवट हीच अफगाणिस्तानची मूळ प्रवृत्ती असल्याचा विचित्र युक्तीवाद इम्रान खान यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकतात. पाकिस्तानातील बुद्धिमंत देखील इम्रान खान यांच्या तालिबानबाबतच्या भूमिकेवर फार आधीपासून टीका करीत आले आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी देखील आंतरराष्ट्रीय समुदायाला आता काबुलमधील तालिबानच्या राजवटीशी चर्चा करावी लागेल, असे सांगून त्यावर समाधान व्यक्त केले. वाटाघाटींनीच समस्या सुटू शकते, यावर पाकिस्तानचा विश्‍वास आहे. पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदाय व तालिबानची राजवट यांच्या वाटाघाटीत पाकिस्तान महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे सांगून परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी आपल्या देशाचा अजेंडा पुढे सरकविला.

पाकिस्तानने तालिबानच्या राजवटीबाबत स्वीकारलेली ही भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर घणाघाती टीकेचा विषय ठरेल. यामुळे पाकिस्तानवर निर्बंध देखील लादले जाऊ शकतात, असा इशारा या देशातील काही विश्‍लेषकांनी दिला होता. अफगाणिस्तानातील घडामोडींमध्ये गुंतून पाकिस्तान आपलाच घात करून घेत असल्याची चिंता या देशातील उदारमतवादी तसेच महिलांच्या अधिकारांसाठी झडगडणारे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

leave a reply