अफगाणिस्तानच्या 18 शहरांवर तालिबानचा ताबा

- अमेरिका तीन हजार मरिन्स रवाना करण्याच्या तयारीत

तीन हजार मरिन्सकाबुल/वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानच्या 202 दहशतवाद्यांना ठार केले. तर याच चोवीस तासात तालिबानने अफगाणिस्तानच्या आणखी आठ प्रांतांच्या राजधान्यांचा ताबा घेतला. यामुळे 34 प्रांतापैकी 18 अर्थात निम्म्याहून अधिक प्रांतीय राजधान्या तालिबानच्या हातात गेल्या आहेत. यानंतर तालिबानने काबुलकडे पावले वळविली असून यामुळे सावध झालेल्या अमेरिकेने काबुलमध्ये तीन हजार मरिन्स तैनात करण्याचे आदेश दिले. मात्र ही तैनाती काबुलमधील अमेरिकन्सच्या सुरक्षित माघारीसाठी असल्याचे दावे केले जातात.

गुरुवारी संध्याकाळी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या गझनी प्रांताचा ताबा घेतला होता. तालिबानने गझनीवर नियंत्रण घेतल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. पण त्यानंतर शुक्रवार संध्याकाळपर्यंत तालिबानने हेल्मंड, कंदहार, हेरात, झाबुल, उरूझगन, लोगार, घोर आणि बदघीस या प्रांतांच्या राजधान्यांवर आपली राजवट प्रस्थापित केली. अवघ्या चोवीस तासात तालिबानला मिळालेले आत्तापर्यंतचे मोठे यश मानले जाते.

यापैकी लोगार प्रांताची राजधानी पुल-ए-अलाम ही काबुलपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे. काबुल आणि पुल-ए-अलाम शहरांना जोडणाऱ्या मधल्या पट्ट्यावर अफगाण सरकार व लष्कराचे नियंत्रण आहे. पण गेल्या दोन दिवसात अफगाणिस्तानातील संघर्षात तालिबानने मारलेली मुसंडी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची बाब ठरते. तालिबानचा हा वेग कायम राहिला तर येत्या काही दिवसात काबुलची कोंडी करण्यात तालिबानचे दहशतवादी यशस्वी ठरतील, हा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

राजधानी काबुल तालिबानच्या हातात गेली तर अफगाणिस्तानातील सरकार कोसळेल, याची जाणीव झालेल्या अमेरिकेने वेगाने लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. काबुलमधील अमेरिकेच्या दूतावासात काम करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षित माघारीसाठी अमेरिकेने तीन हजार मरिन्स अर्थात स्पेशल फोर्सेसचे जवान तैनात करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ वर्तमानपत्राने यासंबंधी माहिती प्रसिद्ध केली. पाकिस्तानच्या हवाईहद्दीचा वापर करून अफगाणिस्तानातील मोहीम राबविणार असल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे. आपल्या नागरिकांना काबुलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढताना तालिबानने आगळीक केली तर पुढील कारवाईची योजनाही तयार ठेवल्याचे या वर्तमानपत्राने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी कॅनडा व जर्मनीचे परराष्ट्रमंत्री तसेच नाटोच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. यानंतर नाटोने अफगाणिस्तानातील संघर्षाच्या मुद्यावर आपल्या सर्व सदस्य देशांची तातडीची बैठक बोलाविली. जर्मनीने काबुलमधील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे जाहीर केले. तर डेन्मार्क, नेदरलँड, नॉर्वे या युरोपिय देशांनी दूतावास बंद करण्याची घोषणा केली.

अमेरिकेने अधिकृतरित्या याची घोषणा केलेली नाही. काही महिन्यांपर्यंत अफगाणिस्तानात अमेरिकेचे 3,500 जवान तैनात होते. यापैकी बरेच जवान माघारी घेतल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले होते. पण तालिबानची पावले काबुलकडे वळल्यानंतर अमेरिका तीन हजार मरिन्स पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून अफगाणिस्तानात रवाना करणार आहे. पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा अमेरिकेकडून होणारा वापर घातक ठरेल, असा इशारा पाकिस्तानातील अमेरिकाविरोधक व तालिबानसमर्थक देत आहेत.

leave a reply