अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर तालिबानचा जल्लोष अफगाणिस्तान स्वतंत्र व सार्वभौम बनल्याची तालिबानची घोषणा

सार्वभौमकाबुल – ‘अफगाणिस्तान हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र बनले आहे. अमेरिकेचा पराभव झाला असून अफगाणी आपल्या स्वातंत्र्य आणि मुल्यांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत’, अशी घोषणा तालिबानने केली. सोमवारी रात्री अमेरिकेच्या शेवटच्या जवानाने काबुल विमानतळावरुन माघार घेतली. त्याबरोबर तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबुलमध्ये फटाके फोडून जल्लोष केला. दरम्यान, अमेरिकेच्या या माघारीबरोबर गेली दोन दशके नाटोसाठी काम करणाऱ्या अफगाणींना तालिबान हालहाल करून ठार करीत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

कतारस्थित अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’चे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीची घोषणा केली. सोमवारी मध्यरात्रीसाठी एक मिनिटाचा अवधी असताना अमेरिकेच्या हवाईदलाचे मेजर जनरल ख्रिस डॉनाहे यांनी ‘ग्लोबमास्टर सी-17’ विमानासह काबुल विमानतळ सोडले. नाईट व्हिजन कॅमेराने टिपलेला मेजर जनरल डॉनाहे यांचा हा फोटो अफगाणिस्तानातील अमेरिकेची माघार दर्शविणारा ठरला. माध्यमांमध्ये हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर काबुलच्या रस्त्यांवर तालिबान व त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.

सार्वभौमयेथील लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर्स निकामी केले असून यातील काहीही तालिबानला वापरता येणार नाही, असा दावा अमेरिकेने केला आहे. मंगळवारी पहाटे तालिबानच्या ‘बद्रि 313’ या गटाने काबुल विमानतळाचा पूर्ण ताबा घेतला. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने विमानतळावर ‘बद्रि 313’ गटाशी चर्चा केली तसेच तालिबानच्या हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी इथे उपस्थित होता. तालिबान व हक्कानी नेटवर्क या दोन वेगळ्या संघटना असल्याचे दावे अमेरिकेने केले होते. पण अनस हक्कानीचा काबुल विमानतळावरील वावर अमेरिकेच्या दाव्यात तथ्य नसल्याचे दाखवून देत आहे.

काबुल विमातळावरच माध्यमांशी बोलताना झबिउल्लाह मुजाहिद याने 20 वर्षानंतर अफगाणिस्तान स्वतंत्र आणि सार्वभौम झाल्याचा दावा केला. या दोन दशकांच्या युद्धात अमेरिका पराभूत झाल्याची घोषणा करून मुजाहिद याने त्यावर आनंद व्यक्त केला. मात्र यापुढे अफगाणिस्तानला सर्वच देशांबरोबर चांगले संबंध हवे असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. त्याचबरोबर अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्याची आवश्‍यकता असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने जाहीर केले. अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांची तीन दिवसांची बैठक आयोजित केल्याची माहिती मुजाहिदने दिली.

सार्वभौमतालिबानच्या प्रवक्त्याने अफगाणींच्या अधिकारांची सुरक्षा करणार असल्याचे जाहीर केले. पण प्रत्यक्षात तालिबानचे दहशतवादी सूडाने पेटून उठल्याच्या घटना समोर येत आहेत. कंदहार प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांनी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला एक मृतदेह टांगल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गेली काही वर्षे अमेरिका व नाटो लष्करासाठी दुभाषाचे काम करणाऱ्या अफगाणीची घृणास्पदरित्या हत्या करून त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला टांगून शहरात फिरवल्याचा दावा केला जातो. तर आमचे हेलिकॉप्टर्स कंदहार शहरावर फक्त गस्त घालत असल्याचे सांगून तालिबानने या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला.

तर अफगाणिस्तानच्या काही भागात तालिबानने नाटो लष्कराला सहाय्य करणारे दुभाषी तसेच सरकारी कर्मचारी आणि अफगाणी जवानांच्या घरावर पत्रक लावून शरण येण्याची सूचना केली आहे. तालिबानच्या न्यायालयात त्यांचा न्याय केला जाईल, असे या पत्रकात म्हटले आहे. पण तालिबानला शरण गेलो तर ते आपला बळी घेतील, अशी भीती या सर्वांना सतावित आहे. त्याचवेळी अमेरिकेने आपल्याला सहाय्य करणाऱ्यांनी पर्वा न करता त्यांना तालिबानसमोर सोडले आहे, अशी घणघाती टीका जगभरातील लष्करी विश्‍लेषक करीत आहेत. यामुळे पुढच्या काळात अमेरिकेवर कुणीही विश्‍वास ठेवणार नाही, अशी चिंता अमेरिकेचे नेते व माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत.

leave a reply