अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया कायम ठेवून हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांना काळ्या यादीतून बाहेर काढण्याची तालिबानची मागणी

- अमेरिकेला दोहा कराराची आठवण करून दिली

काबुल – ‘तुमचे शिरकाण झाले नाही, हे नशीब समजा’ अशा शब्दात तालिबानच्या दहशतवाद्यांनी महिलांच्या निदर्शनांची बातमी देणार्‍या पत्रकारांना चाबकाने फोडून काढण्याच्या शिक्षेचे समर्थन केले. इतकेच नाही तर आपल्या अधिकारांसाठी निदर्शने करणार्‍य महिलांनाही तालिबानी दहशतवाद्यांनी अशाच स्वरुपाची क्रूर शिक्षा केली आहे. यामुळे तालिबानमध्ये सुधारणा झाल्याचे दावे निकालात निघाले आहेत. अफगाणिस्तानातून तालिबानच्या अशा भयंकर कारवायांच्या बातम्या समोर येत असतानाच, अमेरिकेने तालिबानच्या नेत्यांना दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत अजूनही कायम ठेवले आहे, यावर तालिबानने नाराजी व्यक्त केली. हे दोहा येथे झालेल्या कराराचे उल्लंघन ठरते, असे तालिबानचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात जनतेची जोरदार निदर्शने सुरू आहेत. अफगाणी जनतेने शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून समान अधिकारांसाठी तसेच पाकिस्तानच्या हस्तक्षेपाविरोधात घोषणाबाजी केल्या आहेत. आत्तापर्यंत तालिबानच्या दहशतवाद्यांनी या निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण दोन दिवसांपूर्वी सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर तालिबानने या निदर्शकांवरील कारवाई तीव्र केली आहे.

अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी मिळालेल्या सिराजुद्दीन हक्कानीने अफगाणिस्तानातील सर्व निदर्शने बेकायदा ठरविली. तसेच निदर्शने करणार्‍यांवर कठोर कारवाईचे फर्मान अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने काढले. निदर्शने करण्यासाठी त्यातील घोषणांची आधीच परवानगी काढण्याची सूचना तालिबानने केली आहे. हे आदेश म्हणजे जनतेच्या अधिकारांचा आवाज दडपण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे.

या आदेशांची अंमलबजावणी होण्याच्या काही तास आधी तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबुलमध्ये निदर्शनांचे कव्हरेज करणार्‍या दोन अफगाणी पत्रकारांना ताब्यात घेतले. तालिबानच्या दहशतवाद्यांनी या पत्रकारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व चाबकाने फोडून काढले. यातील एका पत्रकाराचे डोके पायाने चिरडण्याचा प्रकारही घडला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर आलेली ही पहिली घटना असून गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानने डझनहून अधिक पत्रकारांना ताब्यात घेऊन त्यांना तुडवल्याचा दावा केला जातो.

फक्त पत्रकारच नाही तर तालिबानने महिला निदर्शकांनाही अमानवी मारहाण केल्याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स समोर आले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी एका महिलेला चाबकाने तर दुसर्‍या महिलेला बंदुकीने चोपल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ‘तालिबान २.०’ अर्थात तालिबान सुधारणावादी बनल्याचे दावे सपशेल खोटे ठरले आहेत.

त्याचबरोबर तालिबानच्या सरकारमधील हक्कानी नेटवर्कच्या सदस्यांना अजूनही काळ्या यादीत ठेवून अमेरिका दोहा कराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. हक्कानी नेटवर्कच्या प्रत्येक सदस्याला काळ्या यादीतून वगळण्याचे आश्‍वासन अमेरिकेने दिले होते, असा आरोप तालिबानने केला. दरम्यान, हक्कानी नेटवर्क ही तालिबानमधील सर्वात क्रूर संघटना असून अमेरिकेच्या हितसंबंधावरील आत्मघाती हल्ल्यांमागे ही संघटना असल्याचे याआधी समोर आले होते.

leave a reply