अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणाऱ्या निदर्शकांवर तालिबानचा बेछूट गोळीबार

- कित्येक निदर्शकांचा बळी गेल्याची चिंता

राष्ट्रध्वजकाबुल – अफगाणिस्तानला ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्याला गुरुवारी 102 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने राजधानी काबुलसह वेगवेगळ्या शहरांमध्ये अफगाणी जनतेने रस्त्यावर उतरून राष्ट्रध्वज फडकावला व तालिबानच्या विरोधात निदर्शने केली. पाकिस्तानच्या सीमेजवळील कुनार प्रांतात तालिबानचा ध्वज नाकारून राष्ट्राध्वज फडकावणाऱ्या अफगाणी निदर्शकांवर तालिबानने केलेल्या गोळीबारात अनेकांचा बळी गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशारितीने तालिबानने अफगाणिस्तानात ठिकठिकाणी निदर्शकांवर निर्दयपणे कारवाई केलेली आहे. यात नक्की किती जणांचा बळी गेला, ते तालिबान सांगायला तयार नाही. मानवाधिकारांच्या नावाने गळे काढणारी आंतरराष्ट्रीय माध्यमे व मानवाधिकार संघटना देखील याबाबत संवेदनशीलता दाखवायला तयार नाहीत.

तालिबानच्या राजवटीत अफगाणींचे अधिकार अबाधित राहतील, महिलांना शिक्षण व इतर अधिकार असतील, माध्यमांना स्वातंत्र्य असेल, असे दावे तालिबानचे नेते गेल्या दोन दिवसांपासून करीत आहेत. पण गुरुवारी, अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी तालिबानने राजधानी काबुल, असादाबाद या शहरांमधली तालिबानचा गोळीबार निराळेच चित्र जगासमोर आणत आहे. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर जमा झालेल्या अफगाणी जनतेवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला.

राष्ट्रध्वजगेली काही वर्षे अफगाणी वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या महिला वृत्तसंचालिकेला बडतर्फ करून त्याजागी तालिबानने आपल्यातल्या एका दहशतवाद्याला रूजू केले. महिलांच्या अधिकारांबाबत घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात तालिबान महिलांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप या वृत्तसंचालिकेने सोशल मीडियावरुन केला. याशिवाय फरयाब प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांना सहाय्य करण्यास नकार देणाऱ्या एका महिलेला तालिबान्यांनी तिच्या मुलांसमोरच लाथांनी तुडवून ठार केल्याची भयंकर घटना समोर येत आहे.

गुरुवारी वेगवेगळ्या शहरांमध्ये अफगाणी जनतेने राष्ट्रध्वज फडकावून तालिबानच्या राजवटीविरोधात घोषणा दिल्या. काही ठिकाणी अफगाणी जनता आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. तर असादाबाद येथे तालिबानच्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून निदर्शकांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात दोघांचा बळी गेल्याचा दावा वृत्तवाहिन्या करीत आहेत. पण प्रत्यक्षात बळींची संख्या याहून कितीतरी अधिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तालिबानच्या या गोळीबारानंतरही काही अफगाणींनी राष्ट्रध्वज फडकावल्याच्या आणि पाकिस्तानचा धिक्कार केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

leave a reply